Connect with us

गोवा खबर

पोस्टमास्टर जनरल कार्यालयाच्या वतीने टपाल अदालतीचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर : भारतीय टपाल विभागाच्या गोवा क्षेत्रातील, पणजी इथल्या  पोस्टमास्टर जनरल कार्यालयाच्या वतीने येत्या 30 सप्टेंबर रोजी 63 व्या क्षेत्रीय स्तरावरील टपाल अदालतीचे आयोजन केले जाणार आहे. भारतीय टपाल विभागाच्या गोवा क्षेत्रातील, पणजी इथल्या पोस्टमास्टर जनरल यांच्या कार्यालयात सकाळी 11.00 वाजता ही टपाल अदालत आयोजित केली जाईल.

तक्रारींचे प्रभावी निराकरण करण्याच्या उद्देशाने टपाल विभागाच्या वतीने वेळोवेळी अशा लोक अदालतीचे आयोजन केले जाते. यानिमित्ताने टपाल विभागाचे अधिकारी पीडित ग्राहकांना भेटून, त्यांच्या तक्रारींची माहिती संकलित करतात आणि त्यांचे लवकरत लवकर निराकरण व्हावे यासाठीच्या कार्यवाहीला सुरुवात करतात.

गोवा क्षेत्राशी  संबंधित टपाल सेवांबाबतच्या ज्या तक्रारी 6 आठवड्यांत सोडवल्या गेल्या नाहीत, अशा तक्रारी या टपाल अदालतीत हाती घेतल्या जाणार आहेत. या लोक अदालतीमध्ये टपाल, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, बचत बँका आणि मनी ऑर्डरच्या न भरलेल्या पेमेंटसंबंधीच्या तक्रारी देखील हाती घेतल्या जाणार आहेत.

नोंदवलेल्या तक्रारीमध्ये तारखा, नावे आणि ज्या अधिकाऱ्यांकडे मूळ तक्रार केली होती, त्यांचे पद अशा स्वरुपातील माहिती देणे अपेक्षित आहे. इच्छुक ग्राहक त्यांच्या टपाल सेवांबाबतच्या तक्रारी दोन प्रतींमध्ये सहाय्यक संचालक, टपाल सेवा-1, पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, गोवा क्षेत्र, पणजी 403001 या पत्त्यावर पाठवू शकतात. तक्रारी स्वीकारण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर आहे.