गोवा खबर : राज्यात अमली पदार्थांचा पुरवठा थांबवण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे असे विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी शुकवारी म्हटले आणि सहा विद्यार्थ्यांच्या मृत्यूंच्या प्रकरणांत बिट्स पिलानी -गोवा कॅम्पसच्या व्यवस्थापनाविरुद्ध तक्रार नोंदवण्याची मागणी त्यांनी केली आहे.
“रिषी नायर या बिट्स पिलानी गोवा कॅम्पसच्या एक विद्यार्थ्याच्या नमुन्यांमध्ये नार्कोटिक्स आणि बेशुद्ध करणारे पदार्थ जसे की एक्स्टसी, एमडीएमए आणि ऍमफेटामायन्स आढळले आहेत. गोवा पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे,” असे आलेमाव म्हणाले.
“मागील अठरा महिन्यांत या संस्थेतील मृत्यूंचे हे सहावे प्रकरण आहे. गोवा पोलिसांनी फेब्रुवारी 2024 मध्ये झालेल्या एका मृत्यूचा प्रकरण लपवले आहे. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना अशा मृत्यूंना बळी पडू देऊ शकत नाही. हे खरोखरच गोवा पोलिसांचे पूर्ण अपयश आहे, जे शैक्षणिक परिसरातही अमली पदार्थांचा पुरवठा थांबवण्यात असमर्थ आहेत,” असे त्यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले की, जर ही संस्था अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना लागू करण्यात अपयशी ठरली असेल, तर व्यवस्थापनालाही जबाबदार धरले पाहिजे.
“या संस्थेत योग्य सीसीटीव्ही देखरेख नाही. विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवायला हवे होते. परंतु इथे तसे काही होताना दिसत नाही. व्यवस्थापनाने या प्रकरणांना खूप हलके घेतले आहे. त्यांना जबाबदार ठरवले पाहिजे,” असे आलेमाव यांनी म्हटले.
“आम्ही वेळोवेळी सांगत आलो आहोत की अमली पदार्थ शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश करत आहेत. परंतु सरकार अनेकदा गुन्हा शोधण्याच्या पोलिस अव्वल आहेत अशा कथा सांगण्यात व्यस्त असते. या संस्थेच्या आजुबाजूला अमली पदार्थांचा पुरवठा होत आहे, पण पोलिसांना असे प्रकार थांबवण्यास अपयश आले आहे,” असे आलेमाव यांनी म्हटले.