गोवा खबर : गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना माजी मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर टीका केली. पाटकर यांनी स्पष्ट केले की, 2007 ते 2012 दरम्यानच्या काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात मोर्मुगाव पोर्ट ट्रस्ट (MPT) विस्तार प्रकल्पाला ठाम विरोध करण्यात आला होता. हा प्रकल्प केवळ कोळसा वाहतुकीसाठी असल्याने गोव्याच्या पर्यावरणासह अस्मितेला गंभीर धोका निर्माण होणार होता, असे ते म्हणाले.
सुदिन ढवळीकर यांनी काँग्रेस सरकारने DPR सादर केला होता असा दावा केला आहे. मात्र, पाटकर यांनी तो खोटा आरोप असल्याचे सांगितले. “ढवळीकर त्या काळी स्वतः सरकारमध्ये मंत्री होते आणि कॅबिनेटने एकमुखाने MPT विस्तार तसेच कोळसा वाहतुकीला विरोध केला होता,” असे ते म्हणाले.
पाटकर यांनी ढवळीकरांना थेट आव्हान दिले की, “जर असा कोणताही DPR काँग्रेसने सादर केला असेल, तर तो लोकांसमोर आणावा.”
काँग्रेस पक्षाने कधीही गोव्यातून कोळसा वाहतूक समर्थित केली नाही, उलट गोमंतकीयांच्या संमतीशिवाय लादल्या जाणाऱ्या प्रकल्पांना कायम विरोध केला आहे, असेही पाटकर म्हणाले. “काँग्रेस पक्ष गोव्याच्या परंपरा, संस्कृती, पर्यावरण जपण्यासाठी व गोमंतकीयांच्या हितासाठी कटिबद्ध आहे,” असे त्यांनी नमूद केले.
भाजपवरही टीका करताना पाटकर म्हणाले, “भाजप हा दांभिक पक्ष असून सतत नवीन जुमलेबाजी करून गोमंतकीयांची दिशाभूल करत आहे. MPT विस्तार व कोळसा वाहतुकीवर भाजपची दुहेरी भूमिका आता उघड झाली आहे.”
काँग्रेस पक्ष गोमंतकीयांसोबत खांद्याला खांदा लावून उभा राहील आणि गोव्याचे पर्यावरण, अस्मिता व भावी पिढ्यांचे रक्षण करेल, असे पाटकर यांनी सांगितले.