गोवा खबर : गणेशोत्सव म्हटला की घराघरांत आकर्षक माटोळी सजवली जाते. प्रियोळ येथील दत्ता नाईक व त्यांच्या कुटुंबीयांनी यंदा तब्बल ३४० हून अधिक फळे, रानफळे, वेली, फुले वापरून भव्य माटोळी तयार केली आहे.
नाईक कुटुंबाने पारपई-मडकई येथील नवदुर्गा गावशीकान्न देवीचे रूप माटोळीतून उभे केले आहे. यासाठी त्यांनी चोर्ला घाटासह विविध जंगलातून दुर्मिळ फळे मिळवली.

दत्ता नाईक यांना याआधीही कला व संस्कृती खात्यातर्फे होणाऱ्या माटोळी स्पर्धेत सलग चार वर्षे पहिले पारितोषिक मिळाले आहे. यंदाची ही अनोखी कलाकृती गणेशभक्तांचे विशेष आकर्षण ठरली आहे.