Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांकडून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यात ‘चवथ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंयकारांच्या सर्वात प्रिय सणांपैकी एक असलेल्या गणेश चतुर्थीच्या शुभ प्रसंगी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी लोकांना पर्यावरणपूरक आणि समृद्ध गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, गणेश चतुर्थी हा सर्वात महत्वाचा सण मोठ्या उत्साह आणि आनंदाने साजरा केला जातो. गणपती बाप्पा मार्गदर्शक, संरक्षक आणि अडथळे दूर करणारे दैवत म्हणून ओळखले जाते. श्री गणेश हे ज्ञान, विद्या, धार्मिकता, सौभाग्याचे मूर्त स्वरूप आहे आणि त्यांच्या भक्तांच्या हृदयात त्यांचे विशेष स्थान आहे. गणरायाला विघ्नहर्ता, मंगलमूर्ती आणि सर्वात प्रथम पुजला जाणारा देव, असे मानले जाते.

मुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात पुढे म्हणतात की, चवथ ही लोकांच्या जीवनात नवीन आशा आणि अपार आनंदाचा प्रकाश पसरविते, त्यामुळे भगवान गणेश हे सर्वात प्रिय दैवत आहे. या सणानिमित्त कुटुंबे आणि नातेवाईक एकत्र येऊन त्यांच्या वडिलोपार्जित घरी पारंपारिक विधींसह श्री गणेशाची पूजा करून गणेश चतुर्थी एकत्रितपणे साजरी करतात. हा सण लोकांना निसर्गाचे संवर्धन आणि संरक्षण करण्यास देखील प्रोत्साहित करतो.

श्री गणेशाच्या आशीर्वादाने, गोवा राज्य अडथळ्यांवर मात करून सर्व क्षेत्रात समृद्ध होवो. या शुभ प्रसंगी, आपण एकत्रितपणे विकसित गोवा निर्माण करण्याची प्रतिज्ञा करूया. ‘विकसित गोवा २०३७’ आणि ‘विकसित भारत २०४७’साठी आपण योगदान देत असताना, राज्यातील विकासात्मक कार्यक्रम असेच सुरू राहू दे, हे गणरायाकडे आपले मागणे आहे, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

गणेशोत्सव प्रत्येकाला सुरक्षित, आनंदी आणि भरभराटीचा जावो. श्री गणेश प्रत्येकावर त्यांच्या आशीर्वादांचा वर्षाव करो, अशी आपण प्रार्थना करतो. गणराया आपल्या राज्याला आणि देशाला कायम शांती, प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर घेऊन जावो, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.