Connect with us

गोवा खबर

बी.आर. गवई यांना आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा २०२५चे आमंत्रण

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यामध्ये ९ ते १२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा २०२५ मध्ये सहभागी होण्यासाठी राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय आणि गोवा राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग यांच्या वतीने भारताचे मुख्य न्यायाधीश माननीय न्यायमूर्ती बी.आर. गवई यांना हार्दिक आमंत्रण देण्यात आले आहे.

राज्य दिव्यांगजन आय़ुक्त गुरुप्रसाद पावसकर, राज्य दिव्यांगजन विभागाच्या संचालिका वर्षा नाईक, राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाचे सचिव ताहा हाजिक यांनी औपचारिकपणे या महोत्वाची माहितीपत्रक आमंत्रणासमवेत सादर केले. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती महेश सोनक, न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझेस उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कामत, डिसॅबिलिटी अलायन्स फॉर इन्क्लुझिव गोवाचे अध्यक्ष पॅट्रिक डिसूझा, सदाफ खान आणि विशांत नागवेकर हे देखील उपस्थित होते.

भारतातील क्षमतांचा सर्वात समावेशक चळवळ म्हणून आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टची ओळख जगभर पसरली असून या महोत्सवाच्या माध्यमातून जगभरातील तज्ञ, धोरणकर्ते आणि दिव्यांग व्यक्तींना एका व्यासपीठावर एकत्र आणत आहे. २०२५ च्या आवृत्तीत नवोपक्रम, धोरणात्मक संवाद, सांस्कृतिक अभिव्यक्ती तसेच सुलभता आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्वोत्तम पद्धती सादर होणार आहेत.

या प्रसंगी बोलताना राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर म्हणाले, पर्पल फेस्ट हा दिव्यांग व्यक्तींसाठी आशा, सन्मान आणि समान संधीचे प्रतीक म्हणून उदयास आला आहे. सुलभता आणि समावेशकता हे विशेषाधिकार नाहीत, तर मूलभूत अधिकार आहेत हा संदेश जोरकसपणे मांडण्यासाठी भारताचे माननीय सरन्यायाधीश यांना आमंत्रित करण्यामागचा आमचा हेतू आहे. सर्वांसाठी अधिक समावेशक भविष्य घडवण्यासाठी पर्पल फेस्ट २०२५ महोत्सवाचे व्यासपीठ धोरण, नवोपक्रम आणि समाज यांना एकत्र आणणारे ठरणार आहे.