गोवा खबर:“सत्तरी तालुक्यातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास साधणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. वनक्षेत्रात राहणाऱ्या लोकांचे अधिकार कोणत्याही परिस्थितीत अबाधित राहतील. वन अधिकाऱ्यांशी संघर्ष होऊ नये, याची सरकार काळजी घेईल,” असे आरोग्यमंत्री व वाळपईचे आमदार विश्वजीत राणे यांनी सांगितले.
सावर्डे येथे आयोजित गणेश चतुर्थी भेट कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. राणे म्हणाले, “मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली नवे कायदे आणले गेले असून त्यामुळे नागरिकांना सुरक्षाकवच प्राप्त झाले आहे. लोकांची घरे कायदेशीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.”
ते पुढे म्हणाले, “भाजप सरकार बेरोजगारीवर मात करण्यासाठी ठोस प्रयत्न करत आहे. आरोग्य खात्याच्या माध्यमातून सत्तरीत अनेक प्रकल्प उभे राहतील. आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील. प्रतापसिंग राणे, मनोहर पर्रीकर यांनी सुरू केलेल्या विकासमार्गावर आमचे सरकार पुढे चालले आहे. सत्तरीच्या विकासासाठी लोकांनी सहकार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात चतुर्थीच्या निमित्ताने साहित्याचे वितरण करण्यात आले.