Connect with us

गोवा खबर

आसाममध्ये गोवा आयआरबी दलाची भव्य पासिंग आउट परेड; मुख्यमंत्री सावंत उपस्थित

Published

on

Spread the love

गोवा खबर : आसाममधील डेरगाव येथील लचित बर्फकन पोलिस अकादमीत मंगळवारी गोवा पोलिसांच्या ७०० जवानांची भव्य पासिंग आउट परेड पार पडली. या सोहळ्यास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा खास उपस्थित होते.

४३ आठवड्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर ५६९ पुरुष आणि १३१ महिला जवानांनी हा समारंभ गाठला. प्रशिक्षणात शारीरिक क्षमता, मानसिक ताकद, मैदानी रणनीती, कायदा-सुव्यवस्था राखण्याचे तंत्र आणि शस्त्र हाताळणी यांचा समावेश होता.

मुख्यमंत्री सावंत यांनी आसाम सरकार आणि अकादमीचे आभार मानले आणि म्हणाले, आमच्या पोलिसांना येथे उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळाले. नवीन कौशल्यांसह हे जवान गोव्याच्या सुरक्षेसाठी कार्य करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘अखंड भारत’च्या स्वप्नपूर्तीत प्रशिक्षित पोलिस दलाची महत्त्वाची भूमिका असेल.

या बटालियनमध्ये आसाम, मणिपूर आणि गोवा या तीन राज्यांतील पोलिसांनी एकत्र प्रशिक्षण घेतले. सावंत यांनी जवानांना आवाहन केले की, आसाममधील आदरातिथ्य लक्षात ठेवून गोव्यात आसामी नागरिकांना आदराने वागवावे.

मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी गोवा आयआरबीला शुभेच्छा देत सांगितले की, हे जवान गोव्याच्या सुरक्षेसाठी आणि लोकांच्या सेवेसाठी उत्कृष्ट कार्य करतील, असा विश्वास आहे.