Connect with us

गोवा खबर

महोत्सव गोव्याच्या रसिकतेचा… 

Published

on

Spread the love
गोवा खबर:सध्या आपण ज्या युगात वावरतो, तिथे कंटेंट अवघ्या १५ सेकंदात बदलतो, स्क्रीनवर दिसणारे जास्त वेळ मनात राहत नाही आणि सगळं काही “स्क्रोल”वर चालतं. अशा वेळी गोवा मराठी चित्रपट महोत्सव (GMFF) सारखा उपक्रम आपल्याला आठवण करून देतात की, चित्रपट म्हणजे केवळ काही वेळेपुरती करमणूक नाही, तर आपण सगळ्यांनी आनंदाने, रसिकतेने एकत्र येण्याचा, संवादाचा आणि संस्कृतीचा महोत्सव आहे. 
गोव्यासारख्या राज्यात जिथे कोंकणी आणि मराठी भाषांचे सहअस्तित्व आहे, तिथे अशा सिनेमहोत्सवांनी सांस्कृतिक समजूतदारपण वाढते, संवाद निर्माण होतो आणि कला, परंपरा व नवोन्मेषाचा संगम घडतो. म्हणूनच  चित्रपट पाहणं म्हणजे केवळ करमणूक नसून, ती एक सामाजिक, सांस्कृतिक कृती आहे, आणि हेच अधोरेखित करण्यासाठी यावर्षीदेखील गोवा मराठी सिनेमहोत्सव उत्साहात साजरा होत आहे.
या वर्षी GMFF आपल्या १४व्या पर्वात प्रवेश करत आहे. ९ आणि १० ऑगस्ट २०२५ रोजी, पणजीतील आयनॉक्स, मॅकेनिज पॅलेस आणि ओल्ड जीएमसी बिल्डिंग येथे होणाऱ्या या महोत्सवात एकाहून एक सरस असे २० हून अधिक मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत. यात तब्बल ८ चित्रपटांचे वर्ल्ड प्रीमियर असून, इतर चित्रपट सुद्धा प्रथमच  गोंयकारांना पाहता येणार आहेत.
९ ऑगस्ट रोजी सकाळी ९:३० वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. त्यांनतर प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘निरवधी’ या नव्या चित्रपटाने यावर्षीच्या गोवा मराठी सिनेमहोत्सवाचे उदघाटन होणार असून, यावेळी कलाकार सुबोध भावे आणि उपेन्द्र लिमये यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित राहणार आहे.
दरवर्षी गोवा मराठी सिनेमहोत्सवाच्यावतीने एका जेष्ठ कलाकाराला कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित केले जाते.  या वर्षी हा सन्मान जेष्ठ सिने-नाट्य अभिनेते आणि निर्माते डॉ. मोहन आगाशे यांना प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. आगाशे यांनी केलेले नाट्य व सिनेमासृष्टीतील योगदान येणाऱ्या प्रत्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरत असून त्यांच्या या सन्मानाने या कृतज्ञता पुरस्काराचाच सन्मान होत असल्याची भावना आयोजकांच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे.
महोत्सवात यंदा प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात स्थळ, घात, जित्राब, असा मी अशी मी, आमायरा, दृश्य-अदृश्य, परिनती, डॉ. मोहन आगाशे आणि रोहिणी हट्टंगडी अभिनित आटली बातमी फुटली , तसेच आता थांबायचं नाय!, गुलकंद, एप्रिल मे ’९९  आणि पाणी  आदींसह २०  चित्रपटांचा प्रामुख्याने समावेश आहे.
त्याचप्रमाणे या महोत्सवात गोव्याचे सिनेप्रतिनिधित्व म्हणून, गोव्यातील दोन तरुण दिग्दर्शकांचे दोन लघुपटदेखील दाखवण्यात येणार आहेत. यात इफ्फि २०२४सह विविध राष्ट्रीय आणि अंतराष्ट्रीय लघुपट महोत्सवात गाजलेला ‘एक कप च्या…! हा किशोर अर्जुन लिखित दिग्दर्शित कोंकणी लघुपट आणि  कर्ज  हा शर्व शेठ्ये दिग्दर्शित हिंदी लघुपट यांचा विशेष समावेश आहे.
या महोत्सवाच्यानिमित्ताने एक नवी सुरुवात करत, आयोजकांच्या वतीने ८ ऑगस्ट रोजी “AI आणि कंटेंट क्रिएशन” वर विशेष कार्यशाळा आयोजित केली असून, नवोदित फिल्ममेकर्ससाठी ही एक प्रेरणादायी संधी ठरणार आहे.