गोवा खबर : समाजसेवा, माणुसकी आणि आरोग्यव्रत या तिन्ही संकल्पनांचं समर्पित रूप म्हणजे पेडण्याच्या मातीतला माणुसकीचा दीपस्तंभ डॉ. देविदास शिरोडकर आहेत. आज डॉ. देविदास शिरोडकर यांचा सन्मान करताना केवळ एका डॉक्टराची नव्हे, तर एका जीवंत मूल्यपद्धतीची प्रतिष्ठा आपण उजळवत आहोत. पेडण्यातील दुर्गम भागात जाऊन, साधनसंपत्ती नसतानाही आरोग्यसेवा पोचवणं ही केवळ व्यावसायिक जबाबदारी नव्हे, ती एक समाजिक बांधिलकी आहे. त्यांच्या चेहऱ्यावर कायम असलेलं हास्य, आणि शब्दांतून मिळणारा धीर हेच त्यांच्या वैद्यकीय सेवेचे खरे औषध आहे, असे प्रतिपादन हरमल जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर यांनी केले.
पेडणे येथे नवचेतना युवक संघातर्फे पेडणे तालुक्यात गेली ५१ वर्षे सेवा बजावणारे ज्येष्ठ डॉक्टर देविदास शिरोडकर यांचा जागतिक डॉक्टर्स दिनानिमित्त गौरव करण्यात आला. याप्रसंगी रंगनाथ कलशावकर बोलत होते. यावेळी चांदेल हसापूर पंचायतीचे सरपंच तुळशीदास गावस, ज्येष्ठ चित्रकार पी.ए सूर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष मधुकर पालयेकर, ज्येष्ठ नागरिक दत्तराम कासकर, नाट्यलेखक भगवान शेटकर, पत्रकार निवृत्ती शिरोडकर, फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव गवंडी, नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर, प्रकाश कवठणकर, सहदेव परब उपस्थित होते.
सेवा हीच पूजा मानणारे डॉक्टर : तुळशीदास गावस
सरपंच तुळशीदास गावस म्हणाले, डॉ. शिरोडकर हे नाव म्हणजे गेल्या ५१ वर्षांहून अधिक काळ पेडणे तालुक्याच्या आरोग्य सेवेचा एक अनमोल अविभाज्य भाग ठरले आहे. ते डॉक्टर आहेत पण त्यांनी औषधांपेक्षा माणुसकीने अधिक जखमा बऱ्या केल्या आहेत. ते आरोग्यसेवक आहेत पण त्यांनी सेवा ही पूजा मानली आणि प्रत्येक रुग्णात देव पाहिला. पेडणे तालुक्यात त्यांनी दिलेली सेवा ही खूप मोलाची असून अशा सेवाभावी डॉक्टरांचे जीवन निश्चितच पुढील पिढीसाठी प्रेरणादायी आहे.
गावोगावी फिरणारा ‘देविदास’- माणुसकीचा दूत : सूर्यवंशी
पी. ए. सूर्यवंशी म्हणाले, पेडणे तालुक्यात डॉ. शिरोडकर हे एकेकाळी रुग्णांपर्यंत पोचण्यासाठी खाचखळग्यांतून प्रवास करायचे, कधी एखाद्या वृद्धाच्या दारात निराधार औषध घेऊन उभे राहायचे, ते कधी विद्यार्थ्यांना आरोग्य शिबिरातून ज्ञान देतात तर कधी तरुणांना व्यसनमुक्तीचा मंत्र देत असतात. डॉ. शिरोडकर हे केवळ डॉक्टर नाहीत, ते एक चैतन्य आहेत, जे पेडण्याच्या प्रत्येक कोपऱ्यात फिरत राहतं. ज्या काळात पेडणे तालुक्यात कुठलीच साधन सुविधा नव्हती त्या काळात रुग्णांच्या घरी जाऊन तपासणी करणारा हा डॉक्टर स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवणारा हा सेवाभावी खरा योद्धा होता.
हा सन्मान म्हणजे पेडण्याच्या मातीतून मिळालेली माणुसकीची पावती : डॉ. देविदास शिरोडकर
डॉ. देविदास शिरोडकर म्हणाले, आजवर मी कधीच कोणताही गौरव व्यासपीठावरून स्वीकारलेला नाही. ही सेवा मी कधीच पुरस्कारासाठी केली नाही पण आज माझ्या क्लिनिकमध्ये अचानक झालेला हा सन्मान म्हणजे पेडण्याच्या मातीतून मिळालेली माणुसकीची पावती आहे. पेडण्याच्या मातीने आपल्यावर भरभरून प्रेम केले आणि ही संधी मला श्रीदेवी भगवतीचा आशीर्वाद म्हणून मिळाली आणि पेडणे तालुक्याच्या प्रेमानेच ही सेवा मी इतकी वर्षे करू शकलो. प्रत्येक रुग्णामध्ये आपण देव पाहिला आणि माझ्या क्षमतेनुसार त्यांच्यापर्यंत सेवा पोचवण्याचा प्रयत्न केला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. देविदास शिरोडकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कृष्णा पालयेकर यांनी केले. महादेव गवंडी यांनी सूत्रसंचालन केले तर प्रकाश कवठणकर यांनी आभार मानले.