गोवा खबर : आस्था संस्थेद्वारे उभारण्यात आलेल्या दिव्यांग व्यक्तींसाठीच्या सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन मंगळवार, ३ जून रोजी म्हापसा-खोर्ली येथे करण्यात आले. दिव्यांगजनांसाठी आस्थाने उभारलेल्या या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या छत्राखाली दिव्यांग व्यक्तींसाठी विविध उपचारात्मक आणि विकासात्मक गरजांसाठी आवश्यक अशा व्यापक, सुलभ आणि समावेशक सेवा प्रदान करणे हे या ऐतिहासिक उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
या केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे मंत्री सुभाष फळदेसाई उपस्थित होते. तसेच राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे; गोवा विधानसभेचे उपसभापती जोशुआ डिसूझा; राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या व पॅरालिम्पिक पदक विजेत्या दीपा मलिक आदी मान्यवरांच्या उपस्थितीमुळे दिव्यांग व्यक्तींचे उत्थान करणाऱ्या उपक्रमांना सामाजिक आणि शासकीय पाठबळ मिळत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
आस्थाचे अध्यक्ष सिद्धेश कोटकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रस्तावनेमध्ये त्यांनी दिव्यांग व्यक्तींसाठीच्या या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या उभारणीमागचा उद्देश स्पष्ट केला.
नवीन सुविधेच्या केंद्रस्थानी विशेष उपचारात्मक केंद्रांचा संच आहे. शारीरिक, संज्ञानात्मक, भावनिक आणि व्यावसायिक विकासाच्या विविध पैलूंचा विकास करण्यासाठी आवश्यक सेवा-सुविधा या केंद्रात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ‘सक्षम’, ‘सरगम’, ‘अपार’, ‘स्वयंम’, ‘म्हादेई’, ‘श्रुती’, ‘अंबर’, ‘सिद्धम’ ही नावे या विविध उपचार, पुनर्वसन आणि विकास केंद्रांना देण्यात आली आहेत.

उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, समावेशक आणि समतापूर्ण गोवा घडविण्याच्या दिशेने आपण सुरू केलेल्या प्रवासात आस्था सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. दिव्यांग व्यक्तींना सक्षम करणे आणि सर्वांना सन्मान, आदर आणि समान संधी मिळत राहतील असा समाज घडविण्यासाठी आमचे सरकार वचनबद्ध आहे.” या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या इमारतीची उभारणी विक्रमी कालावधीत केल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आस्थाच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण करणे, त्यांना सन्मानाचे जीवन उपलब्ध करणे आणि सर्वसमावेशकता वाढवणे यासाठी आमच्या सरकारने स्वीकारलेल्या अटल वचनबद्धतेचा आणखी एक पुरावा म्हणजे आस्थाचे हे सेंटर ऑफ एक्सलन्स आहे. या उपचार, पुनर्वसन आणि विकास केंद्रामध्ये व्यापक साह्यसेवा, बाल्यावस्थेतच निदान व उपचार (अर्ली इंटरव्हेन्शन) करणे, विशेष शिक्षण, कौशल्य विकास, फिजिओथेरपी, हायड्रोथेरपी, पुनर्वसन आणि मार्गदर्शन अशा विविध सेवा एकाच छताखाली प्रदान केल्या जाणार आहेत.
समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले की, आस्था सेंटर ऑफ एक्सलन्स हे केवळ एक सुविधा नाही, तर क्षमताच्या मर्यादेपलीकडे जाऊन प्रत्येक व्यक्तीची प्रगती होईल याबाबतच्या आपल्या सामूहिक संकल्पाचे एक शक्तिशाली प्रतीक आहे. “एकाच छताखाली एकात्मिक सेवा देऊन, आस्थामुळे गोव्यात वेळेवर निदान-उपचारात्मक सेवा, कौशल्य-निर्मिती आणि समग्र पुनर्वसनाचा मार्ग आणखी विस्तारला जाणार आहे.”
आस्था सेंटर ऑफ एक्सलन्स हे समावेशाचे केंद्र म्हणून काम करेल, दिव्यांग व्यक्तींना स्वतंत्रपणे व अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी सक्षम करेल असा विश्वास व्यक्त करत खासदार (राज्यसभा), सदानंद शेट तानावडे म्हणाले, की राज्यातील सर्वाधिक गरजू लोकांना सेवा-सुविधा देणारे असे सार्वजनिक-सामाजिक भागीदारीचे एक उत्तम उदाहरण हे केंद्र ठरणार आहे. ते म्हणाले, “कोणत्याही क्षमतेचा अडसर न राहता प्रत्येक व्यक्तीला योग्य, समान संधी आणि आदर देणारे असे हे आस्था सेंटर ऑप एक्सलन्स असेल हे जाणून मला फार आनंद झाला. जिथे प्रत्येक क्षमतेचा सोहळा होतो, जेथे कोणीही मागे राहत नाही असा समाज घडविण्यासाठी आपण साऱ्यांनी काम केले पाहिजे.”
दिव्यांग व्यक्तींचा समग्र विकास साधणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे याप्रती आस्थाने अवलंबलेली अढळ वचनबद्धता या केंद्राच्या माध्यमातून प्रतिबिंबित होते. आशा आणि करुणामय भावना प्रदान करण्याबरोबरच प्रभावी देखभाल घेणे याबरोबरच विशेष सेवा प्रदान करणे आणि सहभाग वाढवण्याचे काम या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून होणार आहे.
पद्मश्री पुरस्कारप्राप्त आणि पॅरालिम्पिक खेळाडू दीपा मलिक यांनी आपला जीवनप्रवास उलगडताना दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात आणि व्यावसायिक यशामध्ये पुनर्वसन सेवांची मोठी मदत आणि प्रभाव राहत असल्याचे स्पष्ट केले.
केंद्रातील सेवासुविधांची माहिती घेणेसाठी या केंद्राला भेट देण्याचे आवाहन जनतेला करण्यात येत आहे. तसेच या संस्थेच्या कामात योगदान, पाठबळ देता येणार आहे.
या कार्यक्रमास वरिष्ठ सरकारी अधिकारी, व्यावसायिक, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व दिव्यांगजनांच्या विकासक्षेत्रात कार्यरत असलेले तज्ञ, दिव्यांग व्यक्ती, पालक, शुभचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता आस्थाचे सचिव डॉ. चंद्रशेखर केळकर यांनी आभार प्रदर्शनाने केली.