Published
1 year agoon
गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कला अकादमीतील दीनानाथ मंगेशकर कला मंदिर येथे आयोजित ३९ व्या राज्यस्तरीय गोवा घटक राज्य दिन समारंभात बोलताना पूर्वी गोवा फक्त सूर्य, वाळू आणि समुद्र म्हणून ओळखला जात होता, परंतु आता ते आध्यात्मिक पर्यटनाचे ठिकाण म्हणून ओळखले जात आहे. गोव्यात प्रगती घडवून आणण्यासाठी डबल इंजिन सरकारने कसे काम केले आहे याचे हे एक उदाहरण आहे, असे सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, विरासत और विकास’ (वारसा आणि विकास) या तत्त्वांवर गोवा मोठी प्रगती करीत आहे ज्यामुळे राज्याचा चेहरामोहरा झपाट्याने बदलत आहे.
सर्वांना विशेषतः गोव्यातील तरुणांना गोव्याच्या विकासात सहभागी होण्याचे आवाहन करून, त्यांनी त्यांना ‘विकसित गोंय २०३७ मिशन’चा भाग होण्याचे आणि सरकार सध्या तयार करीत असलेल्या व्हिजन डॉक्युमेंटचा भाग होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, सरकार आत्मनिर्भर भारताच्या तत्त्वांनी मार्गदर्शन करीत आहे आणि गोवा स्वयंपूर्ण बनविण्याचे काम करीत आहे. “जर आपण अधिक प्रयत्न केले तर आपण गोवा विकसित करू शकतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गोव्याच्या घटक राज्य दिनाच्या गौरवशाली प्रसंगी, डॉ. सावंत यांनी सुप्रसिद्ध भक्ती गीत गायक पंडित अजित कुमार कडकडे यांना गोवा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान गोमंत विभूषण पुरस्कार जाहीर केला. हा पुरस्कार गोव्यातील वंशाच्या व्यक्तींना त्यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या प्रशंसनीय कार्यासाठी दिला जातो.
डॉ. सावंत यांनी सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे आणि गोव्याच्या विकासात योगदान देणाऱ्या सर्वांचे स्मरण केले. त्यांनी ओपिनियन पोल, भाषा संघर्ष यासारख्या ऐतिहासिक घटनांचे महत्त्व सांगितले, ज्यामुळे गोव्याला त्याची वेगळी ओळख मिळाली. याप्रसंगी सन्मानित करण्यात आलेल्या प्रतिष्ठितांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

याप्रसंगी गोव्यातील ज्या प्रतिष्ठितांना राज्याच्या आर्थिक विकासात आणि गोव्याची ओळख जपण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले ते बिगफूट, लोटली, कॅफे तातो, पणजी, गोमंत विद्या निकेतन, मडगाव, पॉल जॉन डिस्टिलरीज, कुंकळी, झांटे काजू, डिचोली, डांगी ऑप्टिशियन म्हापसा, मावझो फोटो स्टुडिओ, मडगाव, डॉ. कार्मो ग्रासियास हॉस्पिटल, मडगाव, टिटोस, बागा आणि सागर नाईक मुळे, फोंडा यांचा समावेश आहे.
डॉ. सावंत म्हणाले की, यापुढे प्रत्येक गोवा घटक राज्य दिनी, राज्याच्या विकासात योगदान देणाऱ्या गोव्यातील लोकांचा सन्मान केला जाईल आणि ज्यांना अशा लोकांची माहिती आहे त्यांनी त्यांची नावे मुख्यमंत्री कार्यालय किंवा माहिती आणि प्रसिद्धी खात्याकडे द्यावी.
या प्रसंगी मत्स्योध्योग मंत्री नीलकंठ हळर्णकर, कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, कामगार, महसूल आणि कचरा व्यवस्थापन मंत्री अतानासियो मोन्सेरात, पर्यटन मंत्री रोहन खवंटे, जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर, वीज मंत्री रामकृष्ण ढवळीकर, उपसभापती जोशुआ डीसूझा, जेनिफर मोन्सेरात उपस्थित होते. मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडेव्हेलू व्ही., आयएएस, एंड जनरल देवीदास पांगम, राज्य माहिती आयुक्त आत्माराम बर्वे आदी उपस्थित होते. सुरवातीस माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक दिपक बांदेकर यांनी पाहुण्यांचे व्यासपीठावर स्वागत केले.
सुरवातीस शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो यांनी आपल्या स्वागतपर भाषणात आम्ही वेगळ्या राज्याची मागणी केली तेव्हा हा एक निर्णायक क्षण होता आणि गोव्यातील लोकांचे स्वप्न होते की त्यांनी त्यांची वेगळी ओळख टिकवून ठेवली पाहिजे असे सांगितले. गेल्या दहा वर्षांत गोव्याने खूप प्रगती केली आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शन आणि सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले आणि स्वं मनोहर पर्रिकर यांच्या सक्षम नेतृत्वानंतर गोवा आता डॉ. प्रमोद सावंत यांच्या गतिमान नेतृत्वाखाली पुढे वाटचाल करीत आहे असे सांगितले.
या प्रसंगी उल्हास न्यू इंडिया लिटरसी कार्यक्रमांतर्गत गोव्याला पूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या सह-सचिव अर्चना अवस्थी, आयआरएस यांनी हा गोव्यासाठी एक ऐतिहासिक टप्पा असल्याचे सांगितले. ही कामगिरी राज्याच्या समावेशक विकास आणि शिक्षणासाठीच्या दीर्घकालीन वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे आणि देशाच्या इतर भागांसाठी एक उदाहरण आहे असे त्या म्हणाल्या.
एससीईआरटी च्या संचालक मेघना शेटगावकर यांचा मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल सत्कार केला आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला.
प्रशासनातील सर्वोत्तम पद्धतींचे पालन केल्याबद्दल पाच सरकारी खात्यांना सन्मानित करण्यात आले. स्वयंपूर्ण गोवा उपक्रमावरील कामासाठी नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन खाते, कचरा व्यवस्थापन उपक्रमांसाठी गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ, दिव्यांग व्यक्तींशी संबंधित त्यांच्या एकूण कामासाठी दिव्यांग व्यक्तींसाठी सक्षमीकरण खाते, स्वयं-मदत गटांच्या कल्याणासाठी सक्रिय सहभाग आणि कार्यासाठी ग्रामीण विकास खाते आणि जॉगर्स पार्क जवळील चिखली येथील कचरा उपक्रमासाठी पंचायत खाते यांचा समावेश आहे.
ताळगाव, तिसवाडी (उत्तर गोवा) येथील स्वयंपूर्ण ग्रामपंचायत आणि बांदोडा, फोंडा (दक्षिण गोवा) येथील ग्रामपंचायतीचा सत्कार करण्यात आला.
मुख्य वन सर्वेक्षक,अभियंता दिलीश आनंद गांवस देसाई यांचा ताळगांव ग्रामपंचायतीचे स्वयंपूर्ण मित्र म्हणून सत्कार करण्यात आला. थानु नारायण झल्मी, सांख्यिकी अधिकारी, समाज कल्याण संचालनालय, यांचा बांदोडा ग्रामपंचायतीचे स्वयंपूर्ण मित्र म्हणून सत्कार करण्यात आला.
या महत्त्वपूर्ण प्रसंगी राजभाषा संचालनालयाचे भाषा पुरस्कार आयोजित करण्यात आले होते. ‘भाषा पुरस्कार योजना’ कोकणी आणि मराठी भाषांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या व्यक्तींसाठी २०२२-२३ चा ‘ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त रवींद्र केळेकर कोकणी भाषा पुरस्कार’ माणिकराव राम नायक गावणेकर, सन २०२३-२०२४ साठी हा पुरस्कार सुरेश रामचंद्र पै आणि सन २०२४-२५ साठी हा पुरस्कार भिकू बोमी नाईक यांना देण्यात आला.
२०२२-२३ चा ‘बी.डी. सातोस्कर मराठी भाषा पुरस्कार’ शंभूभाऊ बांदेकर आणि २०२३-२४ या वर्षासाठी हा पुरस्कार अनिल गजानन सामंत आणि सन २०२४-२५ साठी हा पुरस्कार रमेश वंसकर यांना देण्यात आला.
सुरवातीस मुख्यमंत्र्यांनी ‘गोवा-पूर्वीचा आणि आताचा या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केले. अभिलेखागार खात्याच्या ‘भारत है हम’ या वेब सिरीजचेही उद्घाटन करण्यात आले. ग्राफिटी स्टुडिओचे चित्रपट दिग्दर्शक आणि सीईओ मुंजाल श्रॉफ यांनी गोव्याच्या मुक्ती संग्रामावर लक्ष केंद्रित करणारी वेब सिरीज लवकरच कशी प्रदर्शित होणार आहे याबद्दल सांगितले. ते म्हणाले की मुले ही सर्वात मौल्यवान प्रेक्षक आहेत आणि त्यांनी त्यांच्या मुळांबद्दल शिकले पाहिजे आणि असे करण्यासाठी अॅनिमेशन हे सर्वोत्तम माध्यम आहे असे ते म्हणाले.
याप्रसंगी ‘टेम्पल्स ऑफ गोवा’, ‘गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर’ आणि ‘विकास पथ: गोव्याची सुधारणा आणि नवीकरणाचा प्रवास’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
गोवा घटक राज्य दिन समारंभात लाभार्थ्यांना गृह खात्याच्या सीएफएफ योजनेअंतर्गत प्रायोजक पत्र आणि कार्मिक खात्याच्या अनुकंपा योजनेअंतर्गत प्रायोजक पत्र वितरीत करण्यात आले. समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी यावेळी आभार मानले.
मुख्यमंत्र्यांहस्ते पत्रकार कृत्तज्ञता निधी योजनेखाली मंजुरी पत्र प्रदान
“Kosambi biography, excellent gift on genius’ 119th birth anniversary’” opine scholars
हंसापूर (पेडणे) येथे ५४ व्या संस्कार वर्गाचे उत्साहात उद्घाटन
‘Rashtriya Shuddhikaran Din’ Observed in Solapur; Five Re-enter Hindu Dharma
Roundglass Tennis Academy’s Puneeth Manohar crowned Doubles Champion at U-14 Super Category event in Germany
Canoe Capsizes off Arossim; Three Mobile Phones Returned to Owners by Drishti Marine Lifesavers Over Weekend