गोवा खबर : साहस आणि सर्वसमावेशकतेचे एक उल्लेखनीय आणि प्रेरणादायी प्रदर्शन करताना, नऊ वर्षांचा दृष्टिहीन बुरहानुद्दीन हाजिकने त्याचा १६ वर्षीय चुलतभाऊ हमजा हाजिक याच्यासोबत यशस्वीरित्या मांडवी नदी पोहून पार केली. पणजीतील काम्पाल जलतरण तलावाचे वरिष्ठ प्रशिक्षक दयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्विम इंडियाच्या पाठबळाच्या जोरावर त्याने ही असाधारण कामगिरी सादर केली.
सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देणे आणि अडथळ्यांवर मात करणे शक्य असल्याचा विश्वास सादर करणे या उद्देशाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे सर्वसमावेशक खेळांच्या प्रसारामध्ये एक मैलाचा दगड म्हणून कौतुक होत आहे.या कामगिरीचे सर्वच घटकांतून कौतुक होत असून, गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालायद्वारेही त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी भारतीय पॅरालिम्पिक समितीचे सरचिटणीस जयवान जी. एच. आणि राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाचे सचिव श्री. ताहा हाजिक उपस्थित होते. अचडणींचा सामना करणे आणि आपली क्षमता प्रदर्शित करणे यासाठी योग्य व्यासपीठ तयार करण्याबाबतचे महत्व त्यांच्या उपस्थितीतून अधोरेखित झाली.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बोलताना, राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाचे सचिव ताहा हाजिक म्हणाले की, “सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देणारी यंत्रणा, भावंडांची ताकद आणि योग्य प्रशिक्षण हे घटक काय साध्य करू शकतात याचे नवे उदाहरण म्हणजे बुऱ्हानुद्दिनची ही कामगिरी आहे. आपण गृहित धरलेल्या मर्यादा ओलांडण्यासाठी ही कामगिरी दिव्यांग मुलांबरोबरच आपणा प्रत्येकाला प्रेरणा देत राहणार आहे.”

आपल्या या यशस्वी कामगिरीबाबत आनंद व्यक्त करताना नऊ वर्षीय जलतरणपटू बुऱ्हानुद्दिन हाजिक म्हणाला, “मी कदाचित पाहू शकणार नाही, पण पाण्याची लय आणि पोहण्याच्या प्रत्येक स्ट्रोकमधील ताकद मला जाणवते. प्रशिक्षण हे सोपे नव्हते, परंतु मी पुढे जात राहिलो, कारण काहीही अशक्य नाही हे मला सिद्ध करायचे होते. माझ्या चुलतभावाच्या सोबतीने आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली, मी स्वतःवर विश्वास ठेवला आणि मांडवी नदी पार केली. मला आता याहून मोठ्या नद्या पोहून पार करायच्या आहेत. अधिक नद्या पोहायचे आहेत आणि इतर मुलांना दाखवायचे आहे, की अशक्य असे काहीही नसते.”
समावेशता, निर्धार आणि सामूहिक प्रयत्न या बाबींच्या जोरावर काहीही साध्य करता येते याचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे. पॅरा-अॅथलीट्स आणि दिव्यांग मुलांना सतत पाठबळ देत राहणे, त्यांच्या प्रयत्नांची योग्य दखल घेणे या बाबींचे महत्व या कामगिरीतून ठळकपणे अधोरेखित होते.