गोवा खबर : सहकार मंत्रालयाचे सचिव डॉ. आशिष कुमार भुतानी यांच्या उपस्थितीत सहकार मंत्रालय आणि स्विगी इन्स्टामार्ट यांच्यात सहकार क्षेत्रातील दुग्धजन्य आणि इतर उत्पादनांना ऑनलाइन बाजारपेठांअंतर्गत समाविष्ट करून घेण्यासंबंधीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. स्विगी इन्स्टामार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितेश झा आणि सहकार मंत्रालयाचे सहसचिव डी. के. वर्मा यांनी 25 एप्रिल रोजी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
या सामंजस्य करारामुळे सहकारी संस्थांना नवीन युगातील तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवीन युगातील ग्राहकांशी सुलभतेने जोडून घेता येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्री अमित शाह यांच्या कुशल मार्गदर्शनाअंतर्गत सहकार मंत्रालयाने देशातील सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी 60 पेक्षा जास्त उपक्रम हाती घेतले आहेत. मंत्रालयाने अलीकडेच सहकार क्षेत्रातील सेंद्रिय उत्पादनांसहित इतर उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानेही अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्याअंतर्गतच केल्या गेलेल्या या सामंजस्य करारामुळे भारत ऑर्गॅनिक्स तसेच इतर सहकारी दुग्धालयाअंतर्गतची उत्पादने आता स्विगीच्या ई-कॉमर्स आणि क्यू-कॉमर्स व्यासपीठांवर उपलब्ध होणार आहेत.

स्विगीच्या डिजिटल व्यासपीठांचा तसेच त्यांच्या देशभरात विस्तारलेल्या जाळ्याचा उपयोग करून घेत भारतातील सहकार चळवळ अधिक बळकट करणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे. या सामंजस्य कराराअंतर्गतच्या भागीदारीमुळे सहकार क्षेत्रातील दुग्धोत्पादनांना स्विगीच्या इन्स्टामार्ट व्यासपीठावर येण्यासाठी प्रोत्साहन मिळेल तसेच त्यांचा प्राधान्याने समावेश केला जावा याकरताही पाठबळ दिले जाईल. यामुळे सहकार संस्थांचा बाजारपेठेतील अस्तित्व अधिक ठळकपणे उठून दिसेल तसेच त्यांची व्याप्ती आणि विस्तार वाढेल याचीही सुनिश्चिती होऊ शकणार आहे. या सामंजस्य कराराअंतर्गत स्विगी मंत्रालयासोबत सहकार क्षेत्राच्या उत्पादनांचे विपणन, जाहिरात, ग्राहक तंत्रज्ञान आणि क्षमता वृद्धीच्या क्षेत्रात एकत्रितपणे काम करणार आहे. याशिवाय या करारानुसार स्विगीच्या व्यासपीठावर एक समर्पित स्वरुपाची सहकार श्रेणीही तयार केली जाईल. या श्रेणीअंतर्गत सेंद्रिय, दुग्धजन्य, भरडधान्ये, हस्तकला आणि सहकारी संस्थांद्वारे विकसित आणि प्रचार केल्या जाणाऱ्या इतर उत्पादनांवर प्रामुख्याने भर दिला जाणार आहे. या सहकार्यपूर्ण भागिदारीमुळे सहकारी संस्थांना नवीन युगातील तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवीन युगातील ग्राहकांशी सुलभतेने जोडून घेता येणार आहे. यामुळे त्यांचे डिजिटल जगतातले अस्तित्व ठळकपणे उठून दिसेल – विस्तारेल तसेच त्यांचे बाजारपेठेतील त्यांचे अस्तित्वही अधिक मजबूत होऊ शकेल.