गोवा खबर : गोवा सरकारच्या पर्यटन खात्याने, गोवा पर्यटक व्यापार नोंदणी कायदा, १९८२ आणि नियम, १९८५ मधील तरतुदींचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी, राज्यात नौकाविहार करणाऱ्या सर्व जलक्रीडा ऑपरेटरना निर्देश जारी केले आहेत. खात्याकडून यासाठी आवश्यक एनओसी (ना हरकत दाखला), परवाना किंवा परवानगी न घेता, नौकाविहार करणाऱ्या ऑपरेटर्सच्या वाढत्या संख्येला लक्षात घेऊन हे निर्देश जरी करण्यात आले आहेत.
खात्याने जारी केलेल्या अधिकृत परिपत्रकानुसार, अशा सर्व ऑपरेटर्सनी नोटीस जारी केल्यापासून कामकाजाच्या १५ दिवसांच्या आत, त्यांच्या क्रियाकलापांची नोंदणी करणे आवश्यक आहे. याचा निर्णयाचा उद्देश नौकाविहार सेवांचे नियमन करणे, पर्यटकांची सुरक्षा वाढवणे आणि कायदेशीर शिष्टाचाराचे पालन सुनिश्चित करणे, हा आहे.
पर्यटन संचालक केदार नाईक यांनी या निर्णयाच्या महत्त्वावर भर देताना सांगितले, की “सुरक्षा, पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यास व राज्यातील जलक्रीडा उपक्रम सुव्यवस्थित करण्यासाठी खाते कटिबद्ध आहे. अनियंत्रित कामकाजामुळे केवळ पर्यटकांनाच नाही तर पर्यावरणालाही धोका निर्माण होतो. आम्ही सर्व ऑपरेटर्सना आवाहन करतो, कि त्यांनी पुढे येऊन विद्यमान कायदेशीर चौकटीच्या अंतर्गत नोंदणी करून त्यांच्या सेवा नियमित कराव्यात.”
हा उपक्रम पर्यटन भागधारकांमधील अनुपालन बळकट करण्यासाठी तसेच सु-नियमित व शाश्वत पर्यटन परिसंस्थेच्या गोव्याच्या दृष्टीकोनानुसार, जबाबदार पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी खात्याकडून सुरु असलेल्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे.