गोवा खबर:चिली आणि एनएफडीसीच्या सहाव्या चित्रपट महोत्सवाची आज एका सुंदर आणि संस्मरणीय समारोप समारंभात सांगता झाली. या महोत्सवात विश्वव्यापी भाषा म्हणून चित्रपटाच्या जादूचा उत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवात गेल्या पाच दिवसांत, चिली आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांच्यातील या असाधारण सहकार्याने दोन्ही देशातील संस्कृतींना एकत्र गुंफत हे सिद्ध केले आहे की भाषा वेगवेगळ्या असल्या तरी कथा मांडणीत विणलेल्या मानवी भावना मात्र समानच असतात.
“चित्रपटात सर्वांना एकत्र आणण्याची शक्ती असते — भलेही आपले शब्द वेगळे असतील, परंतु आपण ज्या भावना सामायिक करतो त्या विश्वव्यापी आहेत. कथाकथनाला कोणतीही सीमा नसते हे या महोत्सवाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे”, असे या महोत्सवाच्या यशाबद्दल बोलताना एनएफडीसीचे महाव्यवस्थापक रामकृष्णन म्हणाले. महोत्सवातील सौहार्दपूर्ण वातावरण आणि उत्साहाने प्रभावित झालेले गुस्तावो गोंझालेझ म्हणाले, “एनएफडीसीसोबतची ही भागीदारी एक सुंदर वाटचाल आहे. चिली आणि भारत भौगोलिक अंतराने दूर असले तरी, चित्रपटावरील आपले समान प्रेम आपल्याला जवळ आणते. अशा अनेक सहकार्यपूर्ण उपक्रमांची मी आतुरतेने वाट पाहत आहे.” अशा रम्य संध्यावेळेला काव्यात्मक स्पर्शाची जोड देत गोंझालेझ यांच्या पत्नीने ‘टू से द व्हॉईस’ चित्रपटापासून प्रेरित एका हृदयस्पर्शी कवितेचे वाचन केले. उपस्थित प्रेक्षक त्यांच्या हृदयस्पर्शी शब्दांनी मंत्रमुग्ध झाले होते.

एनएफडीसी आणि एनएमआयसीच्या व्यवस्थापक जयता घोष यांनी सूत्रसंचालन केलेला समारोप समारंभ हृदयस्पर्शी क्षणांनी आणि कलात्मक कौतुकाने भरलेला होता. प्रेम आणि आदराचे प्रतीक म्हणून, चिलीचे कॉन्सुल जनरल गुस्तावो गोंझालेझ आणि एल उल्टिमो ग्रुमेटेचे संचालक जॉर्ज लोपेझ सोटोमायर यांना चित्रपट प्रदर्शनापूर्वी डी. रामकृष्णन यांनी सन्मानित केले.

“भारतीयांची ऊर्जा, आदरातिथ्य आणि चित्रपटांची आवड यांनी माझ्या मनावर कायमची छाप सोडली आहे” असे भारत भेटीच्या अनुभवाने प्रभावित झालेले जॉर्ज लोपेझ सोटोमायर म्हणाले. हा प्रवास अतुल्य विशेष असून, कायमच्या स्मरणात राहतील अशा आठवणी घेऊन मी परत जात आहे,” असेही ते म्हणाले. त्यांनी त्यांचा आगामी चित्रपट, ‘कॉन्क्वेरर्स ऑफ अंटार्क्टिका’ जो एल उल्टीमो ग्रुमेटेचा बहुप्रतिक्षित दुसरा भाग आहे, त्याची झलकही सादर केली. संध्याकाळी महोत्सवाचा काव्यात्मक समारोप करताना जयता घोष यांनी महोत्सवाचे सार सुंदर शब्दात मांडले: “एनएमआयसीमध्ये, प्रत्येक पाहुणा चित्रपट पाहण्याचा अनुभव घेण्यापेक्षा बरेच काही घरी घेऊन जातो. त्या म्हणजे त्यांच्याकडे आयुष्यभर टिकणाऱ्या आठवणी.”
हा चित्रपट प्रवास सुरू ठेवण्याचे आश्वासन देत तसेच मैत्री, कथाकथन आणि कलात्मक उत्सवाचा वारसा मागे सोडून चिली आणि एनएफडीसी चित्रपट महोत्सव 2025 ची सांगता झाली.