गोवा खबर : मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय खत निर्मिती व्यवसाय करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांनी सेंद्रिय खताचे पर्यावरण, मानवी आरोग्य आणि अर्थव्यवस्थेसाठी असंख्य फायदे आहेत असे सांगितले. सरकार उत्पादित केलेले सेंद्रिय खताची खरेदी करील आणि ते गरजू शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात पुरवतील असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सांखळी येथील रवींद्र भवन येथे आयोजित खरेदीदार विक्रेता मेळावा २०२५ चे उद्घाटन केल्यानंतर बोलत होते.
दोन दिवस चालणाऱ्या या मेळाव्याचे आयोजन कृषी संचालनालयाने, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था, उत्तर आणि कृषी कार्यालय, सांखळी यांच्या संयुक्त विद्यमाने केले आहे.

या प्रसंगी गोवा राज्य फलोत्पादन महामंडळाचे आमदार आणि अध्यक्ष प्रेमेंद्र शेट, सांखळीच्या नगराध्यक्षा सिद्धी प्रभू पोरोब, डिचोली नगर पालिकेच्या नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष शंकर चोडणकर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षा संजना वेळीप, जिल्हा पंचायतीचे सदस्य गोपाळ सुर्लीकर आणि महेश सावंत, कृषी संचालनालयाचे संचालक संदीप फळदेसाई, कृषी संचालनालयाचे उपसंचालक किशोर भावे, गोवा राज्य फलोत्पादन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रहास देसाई, विभागीय कृषी अधिकारी निलीमा गावस आणि इतर उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांसमोर बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शेतकऱ्यांना शेतीसाठी नापीक जमिनीचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करून, नापीक जमिनीचे उत्पादक शेतीत रूपांतर करणे शक्य आहे, ज्यामुळे शाश्वत विकासाला चालना मिळते आणि उपजीविका सुधारते असे ते म्हणाले.

डिचोली तालुक्यातील सुर्ला येथील स्वयंचलित शेती प्रकल्पाविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकारने स्वयंपूर्ण गोवा अभियानांतर्गत या अनोख्या प्रकल्पाची स्थापना करण्यासाठी पुढाकार घेतला आहे असे सांगून त्यासाठी ४.५ कोटी रुपये खर्च येणार असून या प्रकल्पाचा फायदा परिसरातील १०० शेतकऱ्यांना होईल असे त्यांनी सांगितले.
शेट यांनी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केलेल्या तीन नवीन मंडळांचा उल्लेख केला. या मंडळांचा राज्यातील सामान्य माणसाला फायदा होईल असे ते म्हणाले. कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन करून शेट यांनी मुख्यमंत्र्यांकडे विकासाचे स्वप्न आहे, त्यांना गोवा स्वावलंबी राज्य बनवायचे आहे असे सांगितले.
सुरवातीस कृषी संचालनालयाचे संचालक संदीप फळदेसाई यांनी पाहुण्यांचे स्वागत केले आणि खरेदीदार विक्रेता मेळावा आयोजित करण्यामागील मुख्य हेतू सांगितला.
रंजना मलिक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर किशोर भावे यांनी आभार मानले.