गोवा खबर : सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव सोहळा आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष या निमित्ताने ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. हा महोत्सव १७ ते १९ मे २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत फार्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे.
या भव्य महोत्सवासाठी देशभरातून अनेक संत-महंत, मुख्यमंत्री, केंद्र आणि राज्य सरकारांतील मंत्री, प्रखर हिंदुत्वनिष्ठ, विचारवंत, अधिवक्ता, उद्योजक, संपादक आदी मान्यवरांसह २० हजारांहून अधिक साधक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पणजी येथील हॉटेल मनोशांतीमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संतोष घोडगे, सांस्कृतिक न्यासाचे जयंत मिरिंगकर, भारत स्वाभिमानाचे कमलेश बांदेकर, ब्राह्मण महासंघ गोवाचे राज शर्मा, गोमंतक मंदिर महासंघाचे जयेश थळी, कुंडई तपोभूमी येथील पद्मनाभ संप्रदायाचे सुजन नाईक, स्वामी नरेंद्राचार्य महाराजांचे अनुयायीअनिल नाईक, तसेच उद्योजक राघव शेट्टी आणि कदंबाचे माजी महाव्यवस्थापक संजय घाटे हे उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे बोधचिन्ह (लोगो) आणि ‘धर्मेण जयते राष्ट्रम् ।’ या घोषवाक्याचे (टॅगलाईन) अनावरण करण्यात आले.
महोत्सवाविषयी माहिती देतांना राजहंस म्हणाले, या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रामराज्य-स्वरूप आदर्श राष्ट्र निर्माण करण्यासाठी सामूहिक संकल्प केला जाणार आहे. गोव्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर तीन दिवसांसाठी संत-महंत, हिंदुत्वनिष्ठ, मान्यवर आणि प्रतिष्ठित यांच्यासह २० हजारांहून अधिक साधक अन् धर्मनिष्ठ एकत्र येत आहेत. हा गोमंतक भूमीतील सनातन धर्मीयांचा भव्य कुंभमेळाच असून येथे धर्म आणि अध्यात्म यांची दिव्य ज्ञानगंगा प्रवाहित होणार आहे.
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक रविशंकरजी, पतंजली योगपीठाचे संस्थापक रामदेव, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरिजी आणि न्यासाचे महासचिव चंपत राय, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रविंद्र पुरी, अयोध्या हनुमानगढी येथील राजू दास, श्रीक्षेत्र तपोभूमी (कुंडई, गोवा) पिठाधीश्वर पद्मश्री ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी, ‘सनातन बोर्ड’चे प्रणेते देवकीनंदन ठाकूर, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तेलंगाणा येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह, माजी केंद्रीय माहिती आयुक्तउदय माहुरकर, तसेच काशी-मथुरा येथील मंदिरांचा खटला लढवणारे सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन आदी अनेक मान्यवरांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे.