गोवा खबर : गोमेकॉमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाच्या जलद आणि प्रभावी तपासणीसाठी अॅस्ट्राडोनेका सोबत महत्त्वाचा करार करण्यात आला आहे. यामुळे निदानाच्या प्रक्रिया अधिक सक्षम होणार असून, कर्करोगावर उपचारासाठी आवश्यक औषधे सामान्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री विश्वजित राणे बोलत होते. यावेळी गोमेकॉचे डीन आणि अन्य आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही अत्याधुनिक उपाययोजनांवर भर देत आहोत. फुप्फुसाच्या कर्करोगाचे वेळीच निदान होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अॅस्ट्राडोनेका आणि क्यूरे डॉट एआय यांच्या सहकार्याने एआय-आधारित तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. हे तंत्रज्ञान जलद निदान आणि अधिक प्रभावी उपचारास मदत करेल. शिवाय, राज्यातील नागरिकांना जीवरक्षक औषधे ५० ते ६० टक्के कमी दरात उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मंत्री राणे यांनी सांगितले.
त्यांनी पुढे सांगितले, गोव्यातील कर्करोगाशी संबंधित मृत्यूदर कमी करण्यासाठी आम्ही विशेष मोहीम राबवत आहोत. राज्यभरात मेगा मेडिकल कॅम्प आणि कर्करोग शोध अभियान सुरू करण्यात आले असून, सर्वसामान्यांना विनामूल्य तपासणी आणि सल्लामसलत मिळेल.