Connect with us

गोवा खबर

सीआयएसएफ कोस्टल सायक्लोथॉनचा अर्धा टप्पा पार : 3,300 किमीचे अंतर पूर्ण

Published

on

Spread the love

गोवा खबर : भारताच्या 6,553 किलोमीटर लांबीच्या समुद्र किनारपट्टीचा प्रवास करण्यासाठी निघालेल्या सीआयएसएफ कोस्टल सायक्लोथॉन, 2025 या अशा पद्धतीच्या पहिल्यावहिल्या उपक्रमाने 3,300किमी चा प्रवास पूर्ण करत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. तटवर्ती सुरक्षेबाबत जागरूकता वाढवणे आणि भारताच्या सागर किनाऱ्यांचे संरक्षण करण्याच्या संदर्भात किनारपट्टीवरील समुदाय आणि कायदे अंमलबजावणी संस्था यांच्यात अधिक उत्तम सहयोगाची जोपासना करणे हा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) आयोजित केलेल्या या महत्त्वाकांक्षी सायकल फेरीचा उद्देश आहे.

प्रवासाचा अर्धा टप्पा पार करत उद्या, दिनांक 20 मार्च 2025 रोजी ही सीआयएसएफ कोस्टल सायक्लोथॉन मुंबई येथे पोहोचेल. या उपक्रमात सहभागी सायकलस्वारांचे स्वागत करण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित भव्य कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणे तसेच समुदायांशी संवाद आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांद्वारे देशाच्या संरक्षणाची पहिली फळी म्हणून ओळखले जाणारे आणि अंमली पदार्थांची अवैध वाहतूक, हत्यारांची तस्करी आणि इतर बेकायदेशीर कारवायांसारख्या धोक्यांना रोखणारे तट प्रहरी किंवा किनाऱ्यांचे पहारेकरी असलेल्या मच्छिमार समुदायांची महत्वाची भूमिका अधोरेखित करण्यात येईल.

गुजरातमधील लखपत येथून आणि पश्चिम बंगालातील बक्खाली येथून सुरु झालेले सीआयएसएफ कोस्टल सायक्लोथॉन पश्चिम किनारपट्टीलगत 1,955 किमीचा आणि पूर्व किनाऱ्यालगत 1,370 किमी इतका प्रवास करत  आहे. विविध ठिकाणच्या मिरवणुका, कार्यक्रम, आणि जागरूकता अभियानांच्या माध्यमातून आतापर्यंत10 लाख लोक या उपक्रमात सहभागी झाले आहेत तर ऑनलाईन पद्धतीने तब्बल 50 लाख व्यक्ती या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत. त्याशिवाय, तटवर्ती सुरक्षा राखण्यात ऐक्य आणि दक्षतेचे महत्व  अधोरेखित करत, विविध समुदाय सदस्य आणि गटांसह 1,000 हून अधिक नोंदणीकृत सायकलस्वार देखील या उपक्रमात सहभागी झाले आहेत.

नीरज चोप्रा, मनु भाकर,बायचुंग भुतिया, सुरेश रैना आणि जवागल श्रीनाथ यांसारखे क्रीडा क्षेत्रातील दिग्गज तसेच सुनील शेट्टी, अक्षय कुमार, अनिल कपूर, मनोज बाजपेयी आणि मिलिंद सोमण यांसारख्या चित्रपट सृष्टीतील सुप्रसिध्द व्यक्तींसह असंख्य प्रतिष्ठीत व्यक्तिमत्त्वांनी देखील या उपक्रमाला पाठींबा दिल्याने त्याला बळकटी मिळाली आहे. ओदिशाच्या उपमुख्यमंत्री प्रवती पारीदा, पद्मश्री प्राप्त वालुका कलाकार सुदर्शन पटनाईक तसेच अर्जुन पुरस्कारप्राप्त प्रमोद भगत यांसारख्या महत्त्वाच्या व्यक्ती आणि स्थानिक मान्यवरांनी देखील या उपक्रमाला पाठींबा जाहीर केला आहे. क्रिकेट क्षेत्रातील दिग्गज सुनील गावस्कर आणि चित्रपट अभिनेता बोमन इराणी यांनी देखील सीआयएसएफ कोस्टल सायक्लोथॉनसाठी जयघोष करत आहेत आणि या सायकलस्वारांच्या प्रेरणादायक प्रवासासाठी त्यांचा पाठींबा देत आहेत.

या  सायक्लोथॉनच्या प्रवासात, अनेक शहरांमध्ये थांबे निश्चित करण्यात आले असून 23 मार्च 2025 रोजी गोवा, 25 मार्च 2025 रोजी चेन्नई, 26 मार्च 2025 रोजी मंगलोर, 29 मार्च 2025 रोजी कोचीन असे टप्पे पार करत 1 एप्रिल 2025 रोजी कन्याकुमारी येथे या उपक्रमाचा समारोप होईल.