गोवा खबर : कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापीठ’, चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यात यावा, या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, 17 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. १० सहस्रो हिंदूंनी ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा नामविस्तार झालाच पाहिजे, अशी मागणी केली.
मोर्चाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. दसरा चौकातून चालू झालेला हा मोर्चा लक्ष्मीपुरी, व्हिनस कॉर्नर मार्गे ‘बी’ न्यूजच्या कार्यालयावरून जिल्हाधिकारी कार्यालय येथे समाप्त झाला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा आल्यावर जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण तात्काळ थांबवण्यासाठी कबरीला दिला जाणारा निधी बंद करावा, तसेच औरंगजेबाची कबर काढून टाकण्यात यावी, या मागणीचेही निवेदन देण्यात आले.
या मोर्चात विविध आध्यात्मिक संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना, पक्ष, तरुण मंडळे, विविध सामाजिक संघटना, व्यापारी संघटना यांचा प्रमुख सहभाग होता. या मोर्चात सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांच्यासह निपाणी येथील प.पू. प्राणलिंग स्वामिजी यांचा सहभाग होता.
मोर्चाच्या अंती तेलंगणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाईल, सनातन संस्थेचे अभय वर्तक, हिंदू
राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट, छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोददादा पाटील यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सहभागी असलेल्या मावळांचे वंशज यांनी मनोगत व्यक्त केले. यात प्रामुख्याने वीर शिवा काशीद यांचे वंशज आनंदराव काशीद, सरदार मालुसरे यांचे वंशज कुनाल मालुसरे आणि सरसेनापती हंबीररराव मोहिते यांचे वंशज यांनीही मनोगत व्यक्त केले.