Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘अक्षय पात्र’ किचनचे उद्घाटन

Published

on

Spread the love
  • गोवा सरकार आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने उपक्रम

गोवा खबर : ‘अक्षय पात्र’ने गोव्यात शाळकरी मुलांना मध्यान्ह आहार पुरवण्यासाठी नव्याने सुरू केलेल्या अत्याधुनिक स्वयंपाकगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

पिळर्ण औद्योगिक वसाहतीत स्वयंपाकगृहाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी साळगावचे आमदार केदार नाईक, आयएएस अधिकारी शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर आणि उत्तर गोवा जिल्हाधिकारी डॉ. स्नेहा गित्ते विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. अक्षय पात्रचे सह-संस्थापक आणि उपाध्यक्ष चंचलपती दासा यांनी या कार्यक्रमात भाग घेतला. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) च्या वतीने, सीएसआरचे वरिष्ठ प्रमुख सुभाष चंद्र राय यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली. अक्षय पात्रचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि विश्वस्त भरतर्षभ दासा आणि सीईओ श्रीधर वेंकट हे देखील या प्रसंगी उपस्थित होते.

सावंत म्हणाले, मनोहर पर्रीकर यांच्या पुण्यतिथीदिनी मुलांना पौष्टिक मध्यान्ह भोजन देण्याचे त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरताना पाहून मला खूप आनंद होत आहे. जवळजवळ एक दशकापूर्वी ‘अक्षय पात्र’ला गोव्यात आमंत्रित करण्याचा पर्रीकर यांनी पुढाकार घेतला पुढाकार होता आणि २०१३-१४ मध्ये सुरू झालेल्या प्रयत्नांना आज यश आले आहे. अक्षय पात्र स्वयंपाकघर आणि त्यांच्या समर्पित कर्मचाऱ्यांच्या अढळ वचनबद्धतेबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, या वर्षापासून आम्ही इयत्ता नऊवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनाही मध्यान्ह आहार देत आहोत. साळगाव, कळंगुट आणि शिवोली मतदारसंघातील विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे भाग्य लाभले आहे आणि परिणामी आम्हाला आणखी चांगले शैक्षणिक निकाल मिळण्याची अपेक्षा आहे. आम्ही पंतप्रधान पोषण अभियानांतर्गत हा कार्यक्रम राबवत आहोत.

एनपीसीआयचे प्रवक्ते म्हणाले, सीएसआर उपक्रमांतर्गत गोव्यात पहिल्या अक्षय पात्र स्वयंपाकघराच्या स्थापनेला पाठिंबा देताना आम्हाला अत्यानंद होत आहे. गोव्यात यामुळे ५००० शालेय मुलांसाठी मध्यान्ह भोजन उपलब्ध होईल, व मुलांच्या आरोग्याला आणि सर्वांगीण विकासाला हातभार लागेल. या उदात्त उपक्रमाला चालना देण्यासाठी गोवा सरकार आणि अक्षय पात्र फाउंडेशनच्या समर्पित प्रयत्नांचे आम्ही मनापासून कौतुक करतो.

अक्षय पात्र फाउंडेशनचे संस्थापक तथा अध्यक्ष मधू पंडित दासा म्हणाले, ‘गोव्यात आमच्या पहिल्या स्वयंपाकघराचे लाँचिंग हा अक्षय पात्रच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे प्रत्यक्षात आणण्यासाठी मुख्यमंत्री सावंत आणि गोवा सरकारचे आम्ही मनापासून आभारी आहोत. पीएम पोषण कार्यक्रमाचा हेतू शाळेतील प्रवेश आणि उपस्थिती वाढवणे तसेच पोषण वाढवणे आणि शिकण्याची क्षमता वाढवणे हा असून या महत्त्वाच्या मोहिमेत योगदान देत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. गोव्यातील मुलांची समर्पित सेवा करण्यास आम्ही उत्सुक आहोत. गेल्या २४ वर्षांपासून फाउंडेशनच्या प्रयत्नांना सतत पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे आभार मानले.

अक्षय पात्र फाउंडेशनचे सह-संस्थापक आणि उपाध्यक्ष चंचलपती दासा म्हणाले, गोव्यात आमच्या पहिल्या स्वयंपाकघराचे उद्घाटन केल्याबद्दल आणि आम्हाला स्वयंपाकघर सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे खूप आभारी आहोत. अक्षय पात्र या प्रदेशातील मुलांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी सर्व क्षमतांचा वापर करील.

 ते म्हणाले, अक्षय पात्रचे देशातील ७८ वे स्वयंपाकघर असलेली ही नवीन सुविधा नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) च्या पाठिंब्यामुळे शक्य झाली आहे. रोज ५,००० मुलांचा मध्यान्ह आहार तयार करण्याची क्षमता असलेली ही सुविधा ६०० लिटर तांदळाच्या कढईने सुसज्ज आहे जी फक्त ६० मिनिटांत १,२५० जणांचे जेवण तयार करते आणि ६०० लिटर डाळीच्या कढईने सुसज्ज आहे जी ९० मिनिटांत २००० जणांचे जेवण सुनिश्चित करते. इडली स्टीमरव्दारे दर तासाला २००० इडली तयार करता येतात आणि निमस्वयंचलित चपाती मशीन ताशी २००० चपात्या बनवते. एक मानक पद्धत म्हणून, अक्षय पात्र देशभरातील स्थानिक चवीनुसार अन्न पुरवते गोव्यात मेनूमध्ये चपाती, बटाटा भाजी, वटाणा भाजी, कुर्मा भाजी, इडली- सांबार, सोया चंक्स, मिक्स-व्हेज पुलाव इत्यादी पदार्थांचा समावेश असेल.

अक्षय पात्रने २००० मध्ये स्थापनेपासून खूप मोठा पल्ला गाठला आहे. या वर्षी फाउंडेशनची सेवेची २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या स्वयंपाकघराच्या उद्घाटनासह, अक्षय पात्राच्या केंद्रीकृत स्वयंपाकघरांचे नेटवर्क आता १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरले आहे. स्थानिक चव आणि अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता मानकांचे पालन करून गोव्यातील मुलांना पौष्टिक आणि स्वच्छ मध्यान्ह आहार देण्यासाठी फाउंडेशन वचनबद्ध आहे.

शालेय पोषण क्षेत्रातील गोवा सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी अक्षय पात्र राज्यातील लाभार्थी मुलांना ताजे शिजवलेले, स्वच्छ आणि पौष्टिक मध्यान्ह भोजन देईल. या स्वयंपाकगृहासाठी गोवा सरकारने १५,००० चौरस फूट जागा उपलब्ध करून दिली आहे. ५,००० मुलांसाठी येथे मध्यान्ह आहार शिजवून वितरित करण्याची क्षमता आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने आवश्यक स्वयंपाकघर पायाभूत सुविधांसह मदत केली आहे. अक्षय पात्र संस्था सुरवातीला भारत सरकारच्या प्रमुख शालेय आहार कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान पोषण अभियानाचा भाग म्हणून राज्यातील २,५०० मुलांना आहार देईल.

गोव्यात आपल्या पहिल्या स्वयंपाकघराच्या उद्घाटनाने अक्षय पात्रने आपल्या प्रवासात एक नवीन अध्याय सुरू केला आहे. उद्घाटनानंतर मान्यवरांनी स्वयंपाकघराची पाहणी केली आणि मुलांना आहार देण्यात आला. यावेळी मान्यवरांना अक्षय पात्रच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि गोव्यात सेवा सुरू केल्याबद्दल अभिनंदन केले.