Connect with us

गोवा खबर

पर्यटन खात्याकडून, समुद्रकिनारी स्वच्छतेसाठी मेसर्स इकोस्टानइन्फ्रा प्रा. लि.ची नियुक्ती

Published

on

Spread the love

गोवा खबर : पर्यटन खात्याने राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर सर्वसमावेशक स्वच्छता प्रदान करण्यासाठी नवीन कंत्राटदार म्हणून मेसर्स इकोस्टानइन्फ्रा प्रा. लि. ची नियुक्ती केली आहे. १ मार्च २०१५ पासून लागू झालेल्या या कंत्राटामध्ये उत्तर आणि दक्षिण गोव्यातील ५१ नामांकित समुद्रकिनाऱ्यांवरील कचऱ्याचे संकलन, कचरा वेगवेगळा करणे, त्याची वाहतूक आणि विल्हेवाट यांचा समावेश आहे. या कंत्राटानुसार, समुद्रकिनारा स्वच्छता उपक्रम दररोज दोन शिफ्टमध्ये होईल: सकाळची शिफ्ट: सकाळी ६:०० ते दुपारी १२:०० आणि संध्याकाळची शिफ्ट: ४:०० – ८:०० पर्यंत असेल.

 *या उपक्रमाबद्दल बोलताना, केदार नाईक, पर्यटन संचालक, म्हणाले*, की “मेसर्स इकोस्टानइन्फ्रा प्रा. लि. ची नियुक्ती हे गोव्याचे समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याच्या आणि अभ्यागत व पर्यटकांना चांगला अनुभव देण्याच्या आमच्या वचनबद्धतेतील एक महत्त्वाचे पाऊल आहे. या कार्यक्षम कचरा व्यवस्थापन प्रणालीसह, जबाबदार पर्यटन पद्धतींना चालना देत आमच्या किनारपट्टीच्या नैसर्गिक सौंदर्याचे जतन करण्याचे आमचे ध्येय आहे.”

या उपक्रमात उत्तर गोव्यातील पुढील समुद्रकिनारे (२३ समुद्रकिनारे) समाविष्ट करण्यात आले आहेत: केरी, कळसा, हरमल, मांद्रे, आश्वे, मोरजी, वागातोर, वझरी, हणजुणे, बागा, कळंगुट, कांदोळी, शिकेरी, नेरुळ, मिरामार, करंजाळी, दोनापावला, ओशेल, बायंगिणी, नावशी आणि कुडका, शिरदोण, बांबोळी आणि आगाशी. या उपक्रमांतर्गत दक्षिण गोव्यातील पुढील समुद्रकिनारे (२८ समुद्रकिनारे) समाविष्ट करण्यात आले आहेत : बायणा, बोगमालो, हॉलंट, वेळसांव, आरोशी, उतोड्डा, माजोर्डा, बेतालभाटी, कोलवा, सरनाभाटी, बाणावली, वारका, झालोर आणि फात्रादे, कासावली, मोबोर, कांगिणी, काब-दे-राम, कोला, आगोंदा, बटरफ्लाय, पाळोळे, पाटणे, राजबाग, तळपण, गालजीबाग, झांड्रे, पोळे आणि खारीवाडा.

प्लॅस्टिकच्या बाटल्या, काचेच्या बाटल्या, कागद, पुठ्ठा, रिकामे रॅपर, धातूच्या वस्तू, अन्न कचरा, झाडाची पाने, टाकून दिलेल्या वस्तू, मासे आणि सागरी प्राण्यांचा राहिलेला कचरा, डांबर गोळे, तेल गळती, पुराचा कचरा आणि समुद्रकिनाऱ्यावरील शॅक आणि रेस्टॉरंटमधून निर्माण होणारा कचरा यासह सर्व प्रकारचा कचरा उचलण्याची जबाबदारी या कंत्राटदाराची आहे.

उत्तर गोव्यातील समुद्रकिना-यावरील विलगीकरण केलेला कचरा साळगाव, बार्देझ येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात (एसडब्ल्यूएमपी) नेला जाईल, तर दक्षिण गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवरील कचरा योग्य विल्हेवाट लावण्यासाठी काकोडा, कुडचडे, सासष्टी येथील एसडब्ल्यूएमपी येथे नेला जाईल.

या कामासाठी ५१ समुद्रकिनाऱ्यांकडे जाणारे एकूण १२२ जवळचे रस्ते नियमित स्वच्छतेसाठी निश्चित करण्यात आले आहेत. कंत्राटदार समुद्रकिनाऱ्याच्या प्रवेशद्वारापासून १०० मीटरपर्यंत स्वच्छता राखण्याची खात्री करतील आणि यासाठी पुरेसे मजूर आणि दोन रस्ता सफाई मशिन देखील देण्यात आल्या आहेत.

या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करून, २१ जानेवारी २०२५ रोजी त्याची तयारी कळविल्यानंतर मेसर्स इकोस्टानइन्फ्रा प्रा. लि. ला या कामाचे कंत्राट देण्यात आले होते. या कंत्राटचा कालावधी पाच वर्षांचा असून काम समाधानकारक असल्यास दोन वर्षांपर्यंत कंत्राट वाढविण्यात येणार आहे. गुणवत्ता नियंत्रण आणि कार्यक्षमतेची खात्री करून, विविध समुद्रकिनारे स्वच्छतेच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी ५२ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वच्छता राखण्यासाठी, २४०- लिटरच्या कचरापेटी ५०-मीटर अंतरावर ठेवल्या जातील, तर ६६०-लिटरच्या कचरापेटी समुद्रकिनारी प्रवेशद्वार आणि इतर वर्दळीच्या ठिकाणी ठेवल्या जातील.

गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांचे जतन करण्यासाठी पर्यटन खाते कटिबद्ध आहे, जेणेकरून रहिवासी आणि पर्यटक दोघांसाठीही समुद्रकिनाऱ्यांचे आकर्षण राहील. हा उपक्रम राज्याच्या शाश्वत आणि पुनरुत्पादक पर्यटनाच्या व्यापक दृष्टीकोनाचा एक भाग असून यात स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि जबाबदार पर्यटन पद्धतींवर भर देण्यात आला आहे.