गोवा खबर : १४४ वर्षांतून एकदा येणार्या महाकुंभमेळ्याला भारतातील ५० कोटींहून अधिक हिंदू भाविक आणि ५० हून अधिक देशांतील लाखो विदेशी मोठ्या श्रद्धेने येत आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ, अभ्यासक आणि विचारवंत महाकुंभाच्या अध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्वाची दखल घेतात. अशा वैश्विक महोत्सवाला ‘फालतू’ म्हणणारे माजी केंद्रीय रेल्वे मंत्री आणि राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीतर्फे करण्यात आली आहे.
दिल्लीतील रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना लालूप्रसाद यादव यांना महाकुंभमेळ्यातील गर्दीबाबत विचारले असता “कुंभला काही अर्थ नाही. कुंभ फालतू आहे”, असे आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी केल्याचे वृत्त आहे.
लालूप्रसाद यादव यांनी कधीही अन्य धर्मियांच्या तीर्थयात्रांबाबत अशा प्रकारचे अपमानास्पद वक्तव्य केले आहे का? ते हिंदू समाजाच्या श्रद्धास्थानांचा अपमान करणारी वादग्रस्त विधाने करत असतील, तर हा समाजात तेढ निर्माण करण्याचा आणि हिंदूंच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न आहे. याची सरकारने दखल घेतली पाहिजे, असेही समितीने म्हटले आहे.