गोवा खबर: आजवर आम्ही कुडतरीच्या विकासावर भर दिला आहे. इथून पुढेही कुडतरीचा विकास हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. कुडतरीतील रस्ते आम्ही सुधारणार. कुडतरी पोलिस स्टेशनची इमारत तयार झाली आहे. लवकरच इमारतीचे उद्घाटन करण्यात येईल. भूमिगत केबलिंगचे कामही सुरू आहे. देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दक्षिण गोव्याला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून दिलेल्या सौ. पल्लवी धेंपो या प्रामाणिक आहेत. आजवर श्रीनिवास धेंपो यांनी दक्षिण गोव्यातील अनेकांची मदत केली आहे. त्यामुळे आमच्या उमेदवार सौ. धेंपो यांना विजयी करण्यासाठी आज शपथ घेऊया. एकत्र येऊन सौ. धेंपो यांना भरघोस मतांनी निवडून देऊया आणि लोकसभेवर पाठवुया, असे आवाहन कुडतरीचे आमदार श्री. आलेक्स रेजीनाल्ड यांनी उपस्थितांना केला. वाघुळे येथील श्री महाकाली गणपती मंदिरात उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.
भाजपाच्या दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सौ. पल्लवी धेंपो यांनी गुरुवारी कुडतरी मतदारसंघात प्रचार दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत कुडतरीचे आमदार श्री. आलेक्स रेजीनाल्ड, भाजपा एसटी मोर्चाचे उपाध्यक्ष श्री. अँथनी बार्बोझा, गोवा भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ स्नेहा भागवत, कुडतरीचे भाजपा प्रभारी श्री. शर्मद पै. रायतूरकर, भाजपा मंडळ अध्यक्ष श्री. निळकंठ एकावडे तसेच इतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
गोवा आणि गोव्याचा विकास होत राहणार. कुडतरी भागाचा विकास कसा होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. सौ. धेंपो एकट्या विकास करू शकत नाहीत. त्यासाठी त्यांना तुमचा हातभार हवा आहे. सौ. धेंपो यांनी आजवर बंद पडायला आलेल्या अनेक सरकारी शाळा दत्तक घेऊन त्यांची परिस्थिती सुधारली. आज त्या शाळांचा कारभार सुरळीत सुरू आहे. आजवर आपण पाहिले, निवडणुका जवळ आल्या की राजकीय नेते येतात, भाषणे ठोकतात, आश्वासने देतात आणि निवडून आल्यावर पुन्हा फिरकतही नाहीत. पण सौ. धेंपो यांच्या रुपात आम्हाला आज महिला उमेदवार मिळाली आहे. तुम्ही सर्वांनी पाठिंबा दिला तर सौ. धेंपो मोठ्या मताधिक्क्याने निवडून येऊ शकतात. त्या दक्षिण गोव्याचा विकास करू शकतात. दक्षिण गोव्यातून निवडून आल्यास सौ. धेंपो यांनी मडगावात कार्यालय सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. जेणेकरून दक्षिण गोव्यातील लोकांना त्यांच्यापर्यंत सहज पोहोचता येईल. सौ. धेंपो यांना तुमच्यामध्ये राहून तुमच्यासोबत काम करायचे आहे. जो नेता जनतेमध्ये राहतो, तोच खऱ्या अर्थाने जनतेच्या समस्या समजू शकतो. आणि असाच नेता समाजाचा विकास करू शकतो. आम्हाला नेता नको, पण आमच्यासोबत काम करणारी व्यक्ती हवी. सौ. धेंपो इथे मतं मागायला आल्या नाहीत, तर मनं जोडायला आल्या आहेत. मनं जोडली गेली आणि मतं आपोआप मिळतात. सौ. धेंपो कुडतरीचा विकास नक्की करणार, असा विश्वास कुडतरीचे भाजपा प्रभारी श्री. शर्मद पै. रायतूरकर यांनी एकलाती येथे आयोजित कोपरा बैठकीत व्यक्त केला.
आम्ही देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींना बळकट करण्याची गरज आहे. तिसऱ्यावेळी मोदींना देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ हवी. माननीय मोदींमुळेच आम्हाला चांगले रस्ते मिळाले. आमचा प्रवास सोपा झाला. मोपा एअरपोर्टने मोठ्या संख्येने विदेशी पर्यटकांना राज्यात आणले. आयुष हॉस्पिटलच्या रुपात मोठी देणगी गोव्याला मिळाली. अजून एक आयुष हॉस्पिटल मडगाव इथे येणार आहे ते मोदींमुळेच. कुडतरीच्या आरोग्य केंद्राची अवस्था फार बिकट होती. याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांना सांगितल्यानंतर त्यांनी लगेच कुडतरीच्या आरोग्य केंद्र सुधारण्याच्या दृष्टीने पावले उचलली. हा विकास भविष्यातही पाहायचा असेल तर मोदींना बळकट करूया. सौ. धेंपो यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून देऊया, अशी हाक भाजपा एसटी मोर्चाचे उपाध्यक्ष श्री. अँथनी बार्बोझा यांनी एकलाती येथे आयोजित कोपरा बैठकीतील उपस्थितांना मारली.
मी कुडतरी भागात यापूर्वी आले आहे. पण एकलाती भागात आज पहिल्यांदाच आले. गोवा आणि गोंयकारांच्या हिताच्या दृष्टीने काम करण्यास मी पहिले प्राधान्य देईन असे वचन आज देते. केंद्राच्या योजनांचा फायदा गोव्याच्या विकासासाठी करेन असे आश्वासन देते. महिलांच्या समस्या सोडवण्यावर भर देईन. मला मिळणाऱ्या पदावर मी प्रामाणिकपणे काम करेन. मोदींच्या नेतृत्वाखाली आज गोव्यासह देश विकास करतोय. भाजपाने आजवर महिला आणि मुलींसाठी अनेक योजना दिल्यात. राज्यात या योजनांचा फायदा घेतलेले ५ लाखांहून जास्त लोक आहेत. मोदींनी रोजगारही दिला आहे. आम्हाला शाश्वत विकास हवा आहे जो मोदी सरकार देऊ शकते. त्यामुळे मोदींना बळकट करूया, असे सौ. पल्लवी धेंपो म्हणाल्या.
कुडतरी येथील या प्रचार दौऱ्याची सुरुवात एकलाती येथे आयोजित कोपरा बैठकीने झाली. त्यानंतर वाघुळे येथील श्री महाकाली गणपती मंदिरात सौ. धेंपो यांनी प्रार्थना केली. पुढे घोगळ कुडतरी येथील श्री घोगळेश्वर मंदिर ट्रस्टसोबत त्यांनी महत्त्वाची चर्चा केल्यानंतर कामाक्षी कुडतरी येथील श्रीपाद श्रीवल्लभ हाउसिंग सोसायटी येथे आयोजित कोपरा बैठकीत त्यांनी सहभाग घेतला. रात्री ८ वाजता कुडणे येथील श्री दत्त मंदिरात प्रार्थना करून झेविअर निवासस्थानी घेतलेल्या कोपरा बैठकीने या प्रचार दौऱ्याची सांगता झाली.