गोवा खबर:पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री श्री. आलेक्स सिक्वेरा यांनी नागरिकांनी पर्यावरणाच्या हितासाठी सामूहिक जबाबदारीवर भर देत, पाणथळ जामिनीचे संरक्षण करण्यासाठी सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन केले. गोवा राज्य पाणथळ प्राधिकरणातर्फे सांवले लेक पिळर्ण येथे पर्यावरण आणि हवामान बदल खात्याच्या अंतर्गत आयोजित सांवले लेक पिळर्ण येथे जागतिक पाणथळ दिवस २०२४ च्या राज्यस्तरीय समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
विशेषत: सेंट क्रुझमधील बोंडव्होल तलाव पूर्ण कोरडे झाल्यामुळे जलसंस्थांना भेडसावणाऱ्या धोक्याबद्दलची चिंता व्यक्त करून, श्री. सिक्वेरा यांनी अतिक्रमण आणि कचरा टाकणे यासारखी आव्हाने असल्याचे प्रतिपादले. संरक्षणाची जबाबदारी सरकारबरोबर प्रत्येक व्यक्तीची आहे यावर त्यांनी भर दिला.
कार्यक्रमादरम्यान साळगाव मतदारसंघाचे आमदार श्री केदार नाईक यांनी आपले जीवनचक्र सुरू ठेवण्यासाठी जैवविविधता जतन करण्याचे महत्त्व प्रतिपादले. सांवले सरोवराच्या संरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी पिळर्ण पंचायतीचे कौतुक केले. सांवले सरोवराच्या वेळेवर पुनर्संचयित करण्याच्या गरजेवर भर देताना त्यांनी योग्य संवर्धन केल्यास या पाणथळ जमिनीचे गोव्याच्या नकाशावर एक महत्त्वपूर्ण पर्यावरण-पर्यटन स्थळ बनू शकेल असे त्यांनी सूचविले. श्री. नाईक यांनी पिळर्ण येथील रहिवाशांना आणि पिळर्ण पंचायतीने या पाणथळ जागेच्या जतनासाठी महत्त्वाची भूमिका बजाविण्याचे आवाहन केले. गोवा राज्यातील सांवले सरोवराला पाणथळ जागा म्हणून अधिसूचित केल्याबद्दल त्यांनी पर्यावरण मंत्र्यांचेही आभार मानले.

#ADVT विकसित भारत;विकसित गोवा 2047!
जागतिक पाणथळ क्षेत्र दिन २०२४ निमित्त नोडल एजन्सीचे प्रमुख, डॉ. प्रदिप सरमोकादम, यांनी माहिती दिली की सुमारे ७० विद्यार्थी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ येथे पथनाट्य, प्रश्नमंजुषा स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये सहभागी होतील. दिव्यांग व्यक्तींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी पोस्टर बनविण्याची स्पर्धा घेण्यात येईल.
डॉ. सरमोकादम यांनी “वेटलँड मित्र” बनण्याची संकल्पना मांडत प्रत्येकाला पाणथळ मित्र होण्याचे आवाहन केले. इच्छूक व्यक्ती ऑनलाइन नोंदणी करू शकतात किंवा वेटलँड अथॉरिटीला भेट देऊ शकतात आणि वेटलँड संरक्षणासाठी त्यांच्या सेवांचे योगदान देऊ शकतात, अशी माहिती त्यांनी दिली. आपल्या मौल्यवान पाणथळ जमिनींचे संरक्षण करण्यासाठी आपण एकत्रितपणे प्रयत्न करूया असेही ते म्हणाले.

या वर्षाची संकल्पना वेटलँड्स आणि ह्युमन वेलबीइंग आहे. यावेळी ‘वेटलँड्स ऑफ गोवा’ या माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी पिळर्ण- मार्रा ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती डॉ. रेश्मा बांदोडकर, रेईस मागोसचे जिल्हा पंचायत सदस्य श्री. संदीप के. बांदोडकर, बीएमसीचे नगराध्यक्ष श्री. सयाजीराव राणे, पिळर्ण – मार्राचे विद्यार्थी आणि शिक्षक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
पिळर्ण- मार्राचे उपसरपंच श्री अमरनाथ गोवेंकर यांनी स्वागत केले तर पर्यावरण आणि हवामान बदल संचालक श्री जॉन्सन बी फर्नांडिस यांनी आभार मानले.