गोवा खबर:भारतातील स्वतंत्र आणि जबाबदार पत्रकारितेचे प्रतीक म्हणून दरवर्षी १६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा केला जातो. याच दिवशी प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाने (पीसीआय) काम करण्यास सुरुवात केली.
गतवर्षांप्रमाणेच, यंदा देखील माहिती आणि प्रसिद्धी खाते गोवा एडिटर्स गिल्ड, गोवा पत्रकार संघ, गोवा फोटो पत्रकार संघ (पीजेएजी), स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ गोवा (एसजेएजी), इलेक्ट्रॉनिक मीडिया जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ गोवा (इएमजेएजी), दक्षिण गोवा पत्रकार संघ (एसजीजेए) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पत्रकार दिनाचे आयोजन करणार आहे. हा कार्यक्रम १६ नोव्हेंबर २०२३ रोजी इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात होईल.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० वाजता नोंदणीसह होईल, त्यानंतर “डिजीटल, मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावात पत्रकारितेतील आव्हाने आणि संधी” या विषयावर संवादात्मक चर्चासत्र होईल.
चर्चासत्रात टाइम्स ऑफ इंडियाचे क्रीडा संपादक, मार्कूस मेरगुल्हाओ, प्रुडंट मीडियाचे वरिष्ठ पत्रकार, महेश घाडी, डिजिटल गोवाचे निरज नाईक, ज्ञानप्रसारक मंडळ महाविद्यालय आणि संशोधन केंद्राचे सहयोगी प्राध्यापक, श्रीपाद मर्चंट वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. तर दै. लोकमतचे मुख्य बातमीदार, वासुदेव पागी मॉडरेटरची भूमिका बजावतील.
या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे २०२३ सालचा पत्रकारितेतील प्रतिष्ठित जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार, श्री. प्रमोद खांडेपारकर यांना, त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल प्रदान केला जाणार आहे.
यावेळी पत्रकारितेतील योगदानाबद्दल पाच ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये नवहिंद टाईम्सचे संपादक विजय डिसोझा, द गोवन एव्हरीडेचे वरिष्ठ पत्रकार, ॲशली रुझारियो, दै. पुढारीचे वरिष्ठ पत्रकार, शेखर उर्फ विलास महाडिक, गोमंतकचे वरिष्ठ पत्रकार, नरेंद्र तारी, लोकमतचे वरिष्ठ पत्रकार, विठू सुखडकर, या ज्येष्ठ पत्रकारांचा समावेश आहे.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पत्रकार पुरस्कार तसेच खात्यातर्फे आयोजित छायाचित्र स्पर्धांच्या विजेत्यांना पुरस्कार देखील प्रदान करण्यात येतील.