गोवा खबर: पणजीतील डॉन बॉस्को ऑरेटरी सभागृहात भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या राष्ट्रीय ज्युट मंडळाने ज्युट धाग्यापासून तयार केलेल्या उत्पादनांचे विक्री-प्रदर्शन आयोजित केले आहे. हे विक्री-प्रदर्शन १६ ऑक्टोबर पर्यंत खुले असेल. विक्री-प्रदर्शनात पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि देशाच्या इतर राज्यांतील सुक्ष्म ज्युट उत्पादन उद्दोजकांनी आपली उत्पादने मांडली आहेत. ज्युटच्या धाग्यापासून तयार केलेल्या हस्तकला वस्तू, खेळणीं, बॅग्स, भेटवस्तू, व्हॉल हॅगिंग, ज्युट कपड्याची उत्पादने आणि इतर ज्युट उत्पादने विक्रीस उपलब्ध आहेत.

“गोल्डन फायबर” म्हणून ओळखण्यात येणारा ज्युटचा धागा पर्यावरण पुरक आणि लवकर कुजणारा असून ज्युटाच्या उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाच्यावतीने विविध उपक्रम आयोजित करण्यात येतात. ज्युटाची उत्पादने प्लास्टिकला योग्य पर्याय असून लोकांनी ज्युट उत्पादनांचा वापर करून पर्यावरणाचे जतन आणि समतोल राखण्यास मदत करण्याची गरज आहे.
डॉन बॉस्को ऑरेटरीचे संचालक जेम्स मार्कुस, राष्ट्रीय ज्युट मंडळाचे मार्केटिंग प्रमुख टी. अय्यपन, मंडळाचे सहाय्यक संचालक डी. मुखर्जी यांनी काल प्रदर्शनास भेट दिली.