गोवा खबर:कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालयाचे संचालक श्री एस एस गावकर यांनी गोव्यातील तरुणांसाठी रोजगारक्षमता वाढविण्याचा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार असल्याचे पाटो पणजी येथे पत्रकारांना माहिती देताना सांगितले.
सरकारने सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात १० हजार रोजगाराच्या संधी निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सुमारे ४ हजार इच्छुक उमेदवारांनी नॅशनल अप्रेंटिसशिप पोर्टलवर नोंदणी केली आहे. ते म्हणाले की या योजनेंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या ५ वी ते १० पर्यंतच्या उमेदवारांना रु. ८०००/- आणि १२ वी आणि पदवीपर्यंतच्या उमेदवारांना रु. १३०००/- विध्यावेतन देण्यात येईल. केवळ पोर्टलवर नोंदणी करण्यावर अवलंबून न राहता संधी साधण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला त्यांनी युवकांना दिला. सरकारी आस्थापनांसाठी मुख्यमंत्री शिकाऊ धोरण- २०२३ बद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सरकार १५ जुलै २०२३ रोजी जागतिक युवा कौशल्य दिवस साजरा करीत असून या निमित्ताने निवड झालेल्यांना करारपत्रे सुपूर्द केली जातील.

श्री. गावकर यांनी नोंदणीची प्रक्रिया अधिक विशद केली.
कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालयाने गोवा राज्यामध्ये पंधरा वर्षांचे वास्तव्य असलेल्या गोव्यातील तरुणांची रोजगारक्षमता वाढविण्यासाठी सरकारी आस्थापनांसाठी गोवा मुख्यमंत्री शिकाऊ धोरण-२०२३ अधिसूचित केले आहे.

कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालयाचे उपसंचालक श्री विनायक कांबळी, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार श्री. सम्राट नाईक गावकर व इतर यावेळी उपस्थित होते.