गोवा खबर:गोव्यातील तरुण लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी गोवा राजभवनची “नवी पहल” ही योजना आहे. तरुण लेखक जे त्यांचे पहिले पुस्तक कोकणी, मराठी, संस्कृत आणि हिंदी भाषेत प्रकाशित करण्यासाठी धडपडत आहेत, त्यांना सहाय्य्य करण्यासाठी ही योजना आहे. प्रकाशित होणारे पुस्तक काल्पनिक (फिक्शन), नॉन फिक्शन, कविता, चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, काव्यसंग्रह इत्यादींवर असावे. सदर उद्देशासाठी, राजभवनने आर्थिक तरतूद केली आहे आणि अशा लेखकांना त्यांचे पहिले पुस्तक छापण्यासाठी/प्रकाशित करण्यासाठी मदत करण्याची राजभवनची इच्छा आहे.
या योजनेअंतर्गत राजभवनतर्फे एकूण 60 पुस्तकांचा समावेश करण्यात येईल. यामध्ये 25 कोंकणी, 25 मराठी आणि 10 हिंदी आणि संस्कृत भाषातील पुस्तकांचा समावेश असेल.. ज्या लेखकांना राजभवनच्या या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी त्यांचे अर्ज संयुक्त सचिव, राजभवन, दोनापावला, गोवा यांना सादर करावेत. लेखकांनी आपला अर्ज, १५ दिवसांच्या आत किंवा १० मार्च २०२३ पूर्वी लेखकाचा बायोडेटा, पुस्तकाच्या मसुद्याची प्रत तपशीलासह पोस्टाने किंवा व्यक्तिशः सादर करावेत.
पुस्तकात राष्ट्र, राष्ट्रीय धोरणे, राष्ट्रीय नेते यांच्या विरोधात किंवा कोणत्याही धर्म, जात, पंथ इत्यादींच्या भावना दुखावणारा मजकूर असू नये. अधिक माहितीसाठी, आपण राजभवनच्या www.rajbhavan.goa.gov.in या वेबसाइटला भेट देऊ शकता.