गोवा खबर : काँग्रेस पक्षाने काल काँग्रेस भवन, पणजी येथे झालेल्या नवनिर्वाचित गोवा प्रदेश काँग्रेस समिती प्रतिनिधींच्या बैठकीत पदव्युत्तर स्तरावरील वैद्यकीय आणि दंतविज्ञान अभ्यासक्रमांमध्ये ओबीसी, एससी आणि एसटी आरक्षणाच्या मुद्द्यावर गोव्याच्या राज्यपालांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे असे वरिष्ठ उपाध्यक्ष एम के शेख यांनी सांगितले.
काल कॉंग्रेस भवनात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर होते. सदर बैठकीला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता, हळदोणेचे आमदार कार्लोस अल्वारेस फरैरा,दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसीस सार्दिन, वरिष्ठ उपाध्यक्ष एम.के. शेख आदी उपस्थित होते.
काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर आणि विधीमंडळ गटनेते युरी आलेमाव यांनी भारत जोडो यात्रेत भाग घेतल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्याशी झालेल्या भेटीची व चर्चेची माहिती प्रतिनिधींना दिली. दोन्ही नेत्यांनी राहुल गांधींनी यांनी पक्ष बांधणीसाठी केवळ निष्ठावान आणि शिस्तबद्ध कार्यकर्त्यांनाच जबाबदाऱ्या देण्याची सूचना केल्याचे स्पष्ट केले.
या बैठकीत राज्यातील राजकीय घडामोडींचा आढावा घेण्यात आला. तत्काळ सर्व गट समित्या आणि दोन्ही जिल्हा समित्यांचे फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
माध्यम विभागाला बळकट करण्यावर आणि प्रसारमाध्यमात जारी करण्यात येणारी वक्तव्ये व पत्रके, पत्रकार परिषदा इत्यादींत शिस्त आणण्याचेही मान्य करण्यात आले. ओबीसी, एसटी आणि एससीसाठी वैद्यकीय अभ्यासक्रमात पदव्युत्तर स्तरावरील जागा राखीव ठेवण्याच्या मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली. सदर मागणीसाठी चालू असलेल्या आंदोलनाला पुर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात राज्यपालांना भेटून ओबीसी आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करण्याचेही ठरले अशी माहिती वरिष्ठ उपाध्यक्ष एम के शेख यांनी दिली.
गोवा काँग्रेसचे पदाधिकारी या महिन्यात भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. बैठकीत या कार्यक्रमावरही चर्चा झाली.