गोवा खबर:आम आदमी पक्षाचे आमदार इंजिनियर क्रुझ सिल्वा यांनी विधानसभेच्या अधिवेशनात केलेली मागणी आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे वेळ्ळी मतदारसंघात रुग्णवाहिका सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
सिल्वा यांनी 108 रुग्णवाहिका सेवेचे उद्घाटन त्यांच्या कार्यालयाच्या आवारात वेळ्ळी येथील धर्मगुरू फादर अँथनी फर्नांडिस, आपचे सरचिटणीस जर्सन गोम्स आणि वेळ्ळी मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत केले.
सोमवारी वेळ्ळी येथे रुग्णवाहिका सेवेच्या अधिकृत उद्घाटनप्रसंगी सिल्वा यांनी नमूद केले की या सेवेचा
वेळ्ळीसोबत आसपासच्या गावांनाही फायदा होईल. विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सिल्वा यांनी वेळ्ळीमध्ये रुग्णवाहिका सेवा पूर्ववत करण्यासाठी जोर लावला होता.
विधानसभा अधिवेशन दरम्यान केलेली मागणी पूर्ण केल्याबद्दल सिल्वा यांनी आरोग्य मंत्री विश्वजीत राणे आणि सुषमा सैनी (जीवीके ईएमआरआय 108 चीफ ऑफ ऑपरेशन्स) यांचे आभार मानले. नवीन रुग्णवाहिका आयसीयू, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन यांसारख्या संपूर्ण वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज व्हॅन आहे.
आप प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पालेकर यांनी आपल्या मतदारसंघात अत्यावश्यक आरोग्य सेवा मिळवून देण्याच्या प्रयत्नांबद्दल वेळ्ळी आमदाराचे कौतुक केले. लोकांना सर्वोत्तम शिक्षण आणि सर्वोत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न करणे ‘आप’ आमदाराचे वैशिष्ट्य आहे. मग ते सत्तेत असो वा विरोधात, असे ते म्हणाले.