Connect with us

गोवा खबर

पोर्तुगीज चित्रपट ‘कम विथ मी’ने 57 व्या इफ्फीमध्ये उलगडली मैत्री आणि सिनेमाच्या सामायिक अनुभवाची गोष्ट

Published

on

Spread the love


चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याचे प्रेक्षकांमध्ये अद्याप कायम असलेले आकर्षण, जागतिक विषय आणि कलात्मक तसेच व्यावसायिक सिनेमातील बदलते नाते यांवर चित्रपट निर्मात्यांची चर्चा

गोवा खबर:57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील  ‘सिनेमा ऑफ द वर्ल्ड’ (जागतिक सिनेमा) विभागात प्रदर्शित झालेल्या ‘कम विथ मी’ (आंदा दाई – Anda daí) या पोर्तुगीज चित्रपटाचा जागतिक प्रीमिअर पार पडला. त्यानंतर आज गोव्यात पत्र सूचना कार्यालयाने  आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चित्रपटाचे दिग्दर्शक जोआओ लामेइरा, अभिनेते अँटोनियो सिमाओ आणि निर्माते डॅनियल परेरा यांनी संवाद साधला. यावेळी चित्रपटातील मैत्रीचा विषय, त्याची कलात्मक मांडणी आणि ओटीटी सारखे ऑनलाइन दृक्‌श्राव्य प्रसारण मंच अर्थात स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचा वाढता प्रभाव असतानाही चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याचे प्रेक्षकांमधील कायम असलेले आकर्षण आणि महत्त्व, या मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली.

एकत्र येऊन चित्रपट पाहण्याच्या महत्त्वावर भर देताना अभिनेते अँटोनियो सिमाओ यांनी पोर्तुगालमधील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची संख्या कमी होत असल्याबद्दल आणि घरी बसून चित्रपट पाहण्याचा कल वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे, तर लोकांना एकमेकांना भेटण्याची आणि सामूहिक सांस्कृतिक अनुभव घेण्याची संधी असते, असे ते म्हणाले. “लोकांनी एकत्र यायला हवे, संवाद साधायला हवा आणि एकमेकांना भेटायला हवे,” असे सांगत त्यांनी “सिनेमा चिरायू होवो,” अशी भावना व्यक्त केली.

निर्माते डॅनियल परेरा यांनी चित्रपट, चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्याप्रति आपली बांधिलकी पुन्हा एकदा स्पष्ट केली. त्यांची निर्मिती आणि वितरण कंपनी आजही चित्रपटगृहांतील प्रदर्शनालाच प्राधान्य देते, असे त्यांनी सांगितले. ओटीटी व्यासपीठांचा वाढता प्रभाव मान्य करतानाच, ही व्यासपीठे चित्रपटगृहांतील प्रदर्शनाला पर्याय नसून त्याला पूरक माध्यमे आहेत, असे मत त्यांनी मांडले.

या चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक जो लामेरिया म्हणाले की, चित्रपटाची कथा आणि त्यातील सांस्कृतिक वातावरणाचे मूळ लिस्बनमधील असले; तरी पुरुषांच्या मैत्रीची मध्यवर्ती संकल्पना भौगोलिक व सांस्कृतिक सीमांच्या पलिकडे जाऊन प्रेक्षकांना आपलीशी वाटते. चित्रपटाची कथा आणि त्यातील भूमिका प्रत्येकाला समजतील इतक्या वैश्विक आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नेपथ्यामधील वैशिष्ट्य आणि भूमिका स्वतःच प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथेशी बांधून ठेवण्यात मदत करतील असेही ते म्हणाले.

मी मनातून चित्रपटाकडे कलात्मक किंवा लोकप्रिय अशा विशिष्ट वर्गीकरणाच्या दृष्टीने पहात नाही, असे लामेरिया यांनी स्पष्ट केले. “मला जो चित्रपट करावासा वाटला तो मी केला आणि प्रेक्षक त्याला प्रतिसाद देतील अशी आशा होती,” असे त्यांनी सांगितले. कलात्मक व लोकप्रिय चित्रपटांमधील अंतर काळानुसार बदलत गेल्याचे निरीक्षण पेरेरिया यांनी नोंदविले. वेगळ्या दिग्दर्शकीय दृष्टीकोनातून तयार झालेले चित्रपट व लक्षवेधी कथा एकेकाळी प्रेक्षकांकडून अधिक स्वीकारल्या जायच्या असे त्यांनी नमूद केले.

आपल्या अभिनयाविषयीच्या दृष्टीकोनाविषयी बोलताना सिमो यांनी व्यक्तीगत अनुभव, निरीक्षण आणि कल्पनाशक्ती भूमिकेला कसा आकार देते याबद्दल सांगितले. त्यांच्या रंगभूमीवरील प्रचंड अनुभवाचा उल्लेख करुन ते म्हणाले की, पहिल्यांदा ही भूमिका वैयक्तिक आयुष्याशी जवळीक साधणारी वाटली, त्यामुळे आपला व्यक्तीगत अनुभव भूमिकेतून मांडला जाईल अशी काळजी वाटत होती. मात्र शेवटी ते ही शंका बाजूला सारुन भूमिकेची स्थिती व हावभाव यावर लक्ष केंद्रित करू लागले.

इफ्फीमध्ये या चित्रपटाचे जागतिक स्तरावर प्रथम प्रदर्शन झाल्याबद्दल चित्रपटकर्त्यांनी आभार व्यक्त केले. पोर्तुगाल आणि गोवा यांच्यातील ऐतिहासिक व रचनात्मक संबंधांचा उल्लेख करुन ते म्हणाले की गोव्याचे काही पैलू परिचित वाटले तरी एकंदर अनुभव सांस्कृतिकदृष्ट्या अनोखा होता. गोवा पाहण्याची आणि भारतीय प्रेक्षकांना आपले काम दाखवण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन वैशाली पी. यांनी केले.

संपूर्ण पत्रकार परिषद येथे पाहता येईल:

Continue Reading