Connect with us

गोवा खबर

57 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील इंडियन पॅनोरमा 2026 चे उद्घाटन; ज्युरी सदस्यांचा सत्कार

Published

on

Spread the love


भारताची चित्रपट विविधता दर्शविणाऱ्या चित्रपटांच्या निवडीतील योगदानाबद्दल फीचर आणि नॉन-फीचर चित्रपट ज्युरींचा सन्मान

गोवा खबर:आज गोव्यातील पणजी येथे 57 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फीत) इंडियन पॅनोरमा 2026 चे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. इंडियन पॅनोरमा 2026 चे उद्घाटन करताना, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीपासूनच्या उल्लेखनीय विविधतेवर प्रकाश टाकला. त्यांनी असे निरीक्षण नोंदवले की, चित्रपट महोत्सव हा देशातील प्रत्येक प्रदेश आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भाषा, संस्कृती आणि कथांद्वारे कसे योगदान देतो, हे ओळखण्याची एक अर्थपूर्ण संधी देतो. विचारपूर्वक केलेल्या निवडीबद्दल परीक्षक मंडळाचे, तसेच या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल गोवा सरकार आणि महोत्सव चमूचे अभिनंदन करून, त्यांनी भारतीय चित्रपटाला जागतिक स्तरावर सतत ओळख मिळत राहो यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी, या वर्षीच्या अधिकृत निवड प्रक्रियेतील योगदानाबद्दल फीचर आणि नॉन-फीचर चित्रपट ज्युरींच्या प्रतिष्ठित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. ज्युरी सदस्यांचा सत्कार माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार; राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे अध्यक्ष जी. कृष्णकुमार; आणि महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते करण्यात आला.

आपल्या स्वागतपर भाषणात, महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर यांनी इफ्फीच्या सुरुवातीच्या आठवणींना उजाळा दिला आणि गेल्या अनेक दशकांत इंडियन पॅनोरमा भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि चित्रपटविषयक विविधतेचे एक महत्त्वाचे प्रदर्शन म्हणून कसा विकसित झाला आहे, यावर प्रकाश टाकला. या वर्षीच्या निवड प्रक्रियेला मिळालेल्या प्रतिसादावर प्रकाश टाकत त्यांनी नमूद केले की, महोत्सवाला 762 फीचर फिल्म्स आणि 358 नॉन-फीचर फिल्म्सच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या, ज्यामुळे 18 भाषांमधील एकूण प्रवेशिकांची संख्या 1,120 झाली. अंतिम निवडीमध्ये वेब सिरीजसह हिंदी, मराठी, कन्नड, तुळू, लडाखी, काश्मिरी आणि इंग्रजी या 14 भाषांचा समावेश आहे.

उपस्थितांना संबोधित करताना, एनएफडीसीचे अध्यक्ष जी. कृष्णकुमार यांनी, 1978 मध्ये स्थापनेपासून इंडियन पॅनोरमाच्या वारशावर आणि भाषा व प्रदेशांमधील भारताच्या चित्रपटविषयक विविधतेचा उत्सव साजरा करण्यात त्याच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. या वर्षीच्या आयएफएफआयची संकल्पना, स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स अर्थात सीमाविरहित कथा याचा उल्लेख करून, त्यांनी चित्रपटाप्रती मंत्रालयाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि गोवा सरकार व माहिती व प्रसारण मंत्रालयाचे त्यांच्या सततच्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले. त्यांनी महोत्सवात उपस्थित असलेल्या चित्रपट निर्मात्यांचे आणि चित्रपट रसिकांचे हार्दिक स्वागतही केले.

57व्या इफ्फी चित्रपट महोत्सवाच्या ‘मुक्त कथा’ अर्थात स्टोरीज विदाउट बॉर्डर्स’ या मुख्य संकल्पने बाबत आपले विचार मांडताना गोवारीकर यांनी, चित्रपटनिर्माते, तंत्रज्ञ आणि उदयोन्मुख कथालेखकांना आपल्या कथा सातत्याने मांडत राहण्याचे आवाहन केले. तसेच, प्रेक्षकांनी विविध प्रकारचे चित्रपट पहावे आणि त्यांचे विवेकबुद्धीने मूल्यांकन करावे असेही सांगितले.

इंडियन पॅनोरमा 2026 च्या परीक्षक मंडळातील (ज्यूरी) सदस्य

नॉन-फीचर चित्रपट प्रकारांसाठी परीक्षक मंडळात सात सदस्य आहेत:

हिमांशु शेखर खाटुआ (माहितीपट दिग्दर्शक आणि अध्यक्ष, नॉन-फीचर चित्रपट ज्युरी), शंखजीत डे  (माहितीपट निर्माता), रागिनी सोना (चित्रपट निर्माता), शिव सनी (चित्रपट पत्रकार), धनेश यादव टी. आर. (चित्रपट संपादक), अभिजीत दळवी (चित्रपट निर्माता), आणि आरती पटेल (निर्माता आणि मध्यम व्यावसायिक).

फीचर फिल्म चित्रपट प्रकारांसाठी परीक्षा मंडळात  (ज्युरी) तेरा सदस्य आहेत:

मधुर भंडारकर (अध्यक्ष, फीचर फिल्म ज्युरी), यू. रविंधर (छायाचित्रकार), सोहम पी. शाह (चित्रपट निर्माता), राहुल भोळे  (दिग्दर्शक, लेखक आणि संपादक), ओइनाम गौतम सिंग (चित्रपट निर्माता), निलाद्री रॉय (चित्रपट संपादक), एम. एस. प्रभू (छायाचित्रकार), के. एस. शिवरामन (छायाचित्रकार), जयंत गोस्वामी (दिग्दर्शक), बिंदू चंद्रमौली (अभिनेत्री), भारती प्रधान (चित्रपट समीक्षक), डॉ. आयश आरिफ (ज्येष्ठ अभिनेता आणि लेखक), आणि अरुण गोंगडे (अॅनिमेटर).

इंडियन पॅनोरमा 2026 मधील उद्घाटनाला दाखवण्यात येणारे चित्रपट

सत्कार समारंभ पार पडल्यानंतर, इंडियन पॅनोरमा 2026 च्या उद्घाटनात दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांची ओळख करून देण्यात आली आणि त्यांच्या पहिल्या प्रदर्शनापूर्वी त्यांचा सन्मान करण्यात आला.

‘नॉन-फीचर’ चित्रपट श्रेणीमध्ये, दिग्दर्शिका लीना यादव यांच्या ‘बिकमिंग’ (Becoming) या लडाखी चित्रपटाला जी. कृष्णकुमार, डेलिला लोबो आणि आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. लडाखमधील एका लहान मुलाचा आध्यात्मिक प्रवास दर्शवणारा हा  चित्रपट, काळ, स्मृती आणि कित्येक आयुष्यांच्या सीमा ओलांडून पुढे जातो. चित्रपटाच्या दिग्दर्शिका लीना यादव यांनी या कलाकृतीची ओळख करून देताना, सीमांच्या पलीकडील जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या विषयावर भाष्य केले.

‘फीचर’ चित्रपट श्रेणीमध्ये, दिग्दर्शक आदित्य धर यांच्या ‘धुरंधर’  या चित्रपटाचे प्रतिनिधित्व ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांनी केले. या प्रसंगी चंचल कुमार आणि आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते राकेश बेदी यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. राकेश बेदी यांनी दिग्दर्शक आदित्य धर यांच्यासोबत काम करण्याचा आणि चित्रपटात एका वेगळ्या धाटणीच्या गुप्तहेराची भूमिका साकारण्याचा आपला अनुभव उपस्थितांसोबत सामायिक शेअर केला.

समारंभाच्या शेवटी, उद्घाटनासाठी निवडण्यात आलेले दोन्ही चित्रपट प्रदर्शित करण्यात आले; यासोबतच IFFI 2026 मधील ‘इंडियन पॅनोरमा’ विभागाची अधिकृत सुरुवात झाली.

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

Continue Reading