Connect with us

गोवा खबर

“विनोद हा जीवनाकडे पाहण्याचा एक हुशार दृष्टिकोन आहे”: स्पेनच्या ‘लुकिंग फॉर मायकेल’ चित्रपटाचा 57व्या इफ्फीमध्ये जागतिक प्रीमियर

Published

on

Spread the love


एका वास्तविक स्त्रीच्या प्रवासावर आधारित हा संगीतमय प्रवास चित्रपट जीवनातील आव्हानांना सामना करण्यासाठीच्या जिद्द, मैत्री आणि हास्याच्या सामर्थ्याचा शोध घेतो

गोवा खबर:आयुष्यातील कठीण प्रसंगांना हसत हसत सामोरे गेल्यास काय घडू शकते ? स्पेनचा ‘लुकिंग फॉर मायकेल’ (पर्सिगिएन्दो अ मायकेल) हा 2026 मध्ये प्रदर्शित झालेला, जुआना मॅसियास दिग्दर्शित विनोदी-नाट्यपट धैर्य, मैत्री आणि जिद्दीची हृदयस्पर्शी कथा मांडत या प्रश्नाचा वेध घेतो. गोव्यातील पणजी येथे सुरू असलेल्या 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) आज या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर झाला.

या चित्रपटात सोनिया या तरुणीची कथा मांडण्यात आली आहे. तिच्या पार्किन्सन्स आजाराचे निदान झाले आहे. अशा कठीण काळातही ती धैर्याने परिस्थितीचा सामना करण्याचा आणि आयुष्याकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचा निर्णय घेते. हाच आजार असणाऱ्या, तिच्या संगीत उपचार गटातील सदस्यांच्या साथीने ती प्रसिद्ध अभिनेते मायकेल जे. फॉक्स यांना भेटण्यासाठी  प्रवासाला निघते. मायकेल जे. फॉक्स यांनी स्वतः पार्किन्सन्स आजारासह  जगण्याविषयी जाहीरपणे भाष्य केले आहे. संगीत आणि विनोद यांची सुरेख सांगड घालणारा हा रोड मूव्ही प्रतिकूल परिस्थितीतही स्वतःच्या अटींवर आयुष्य जगण्याच्या जिद्दीचा शोध घेतो.

डोरिसची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री लोरेना लोपेझ यांनी सांगितले की, या व्यक्तीरेखेचा कणखरपणा, उत्साही व्यक्तिमत्त्व आणि नुरिया हेरेरोने साकारलेल्या सोनिया या व्यक्तिरेखे सोबतची मैत्री या गोष्टींमुळे आपण या भूमिकेकडे आकर्षित झालो. व्हीलचेअर वापरणारी डोरिस, सोनियाच्या प्रवासात तिची मैत्रीण आणि मार्गदर्शक बनते. आयुष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मैत्री, सहवास आणि परस्पर सहकार्य यांचे महत्त्व या व्यक्तिरेखेतून अधोरेखित होते.

दिग्दर्शक मासियास यांनी कलाकारांना दिग्दर्शित करण्याच्या त्यांच्या पद्धतीबद्दलही सांगितले. तालमी आणि चित्रीकरणादरम्यान कलाकारांच्या उत्स्फूर्त अभिनयाला प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः विनोदी चित्रपटांमध्ये उत्स्फूर्त अभिनय मौल्यवान असतो, ज्यामुळे कलाकारांना त्यांच्या व्यक्तिरेखांमधील नैसर्गिक नातेसंबंध आणि संवाद अधिक प्रभावीपणे विकसित करण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.

चित्रपटातील संगीताच्या भूमिकेबद्दल बोलताना, मासियास यांनी स्पष्ट केले की, चित्रपटातील गाणी सोनियाच्या तिच्या आजारासोबतच्या बदलत्या नात्याचे प्रतिबिंब आहेत. ही गाणी व्यक्तिरेखांच्या भावना आणि अनुभवांशी घट्टपणे गुंफलेली आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीच्या गाण्याचा संदर्भ देत, त्यांनी सांगितले की, सोनियाला आपल्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज आठ गोळ्या घ्याव्या लागतात. दैनंदिन जीवनातील या वास्तवाला चित्रपटाच्या भावनिक कथनात संगीताच्या माध्यमातून प्रभावीपणे गुंफण्यात आले आहे. 

चित्रपटामागील संशोधनाबद्दल बोलताना, मॅसिआस यांनी येस आंद्रेझ आणि पार्किन्सन्स आजाराने ग्रस्त असलेल्या इतर अनेक व्यक्तींच्या घेतलेल्या विस्तृत मुलाखतींबद्दल सांगितले. लोकांच्या कथा पडद्यावर आणताना त्यांच्या अनुभवांची अस्सल आणि प्रामाणिक समज असणे आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला.

स्पॅनिश चित्रपट भारतीय आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांशी कसे जोडले जाऊ शकतात, या प्रश्नाला उत्तर देताना मॅसिआस यांनी सांगितले की, संगीत आणि संकटांवर मात करण्याच्या कथांबाबत वैश्विक आकर्षण आहे. अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्पॅनिश आणि आंतरराष्ट्रीय ओटीटी व्यासपीठासोबत सहयोग करण्याच्या योजनांबद्दलही त्यांनी सांगितले.

इफ्फी मध्ये या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर झाला. भौगोलिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडणारी ही कथा जीवनातील अनिश्चिततेतून मार्ग काढण्यासाठी विनोद, संगीत आणि मानवी नात्यांच्या शक्तीची प्रेक्षकांना आठवण करून देते.

कुलदीप मीना यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.

Continue Reading