Connect with us

गोवा खबर

गोव्यात आता दुकाने, मॉल्स आणि व्यापारी आस्थापने २४ तास सुरू ठेवण्यास परवानगी

Published

on

Spread the love

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; १६ नोव्हेंबरपासून नवे नियम लागू, पुढील तीन वर्षांसाठी परवानगी

गोवा खबर : गोवा सरकारने राज्यातील सर्व दुकाने, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स आणि व्यापारी आस्थापने दिवसाचे २४ तास सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. पर्यटन आणि व्यापार क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील अधिसूचना १६ नोव्हेंबर २०२६ पासून लागू झाली आहे.

राज्याच्या कामगार खात्याने १६ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या विशेष राजपत्रातील अधिसूचनेनुसार ही परवानगी देण्यात आली आहे. गोवा दुकाने आणि आस्थापना (रोजगाराचे नियमन आणि सेवाशर्ती) कायदा, २०२५ च्या कलम ११ अंतर्गत दुकाने आणि व्यापारी आस्थापनांना २४ तास व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे.

सरकारने दिलेली ही परवानगी पुढील तीन वर्षांसाठी लागू राहणार आहे. मात्र, आवश्यकतेनुसार सरकार ही परवानगी मुदतीपूर्वी रद्द करू शकते.

याचबरोबर राज्य सरकारने १९७३ सालच्या जुन्या कायद्याच्या जागी गोवा दुकाने आणि आस्थापना कायदा, २०२५ लागू केला आहे. हा नवीन कायदा १६ नोव्हेंबर २०२६ पासून संपूर्ण राज्यात अमलात आला आहे.

दुकाने आणि मॉल्स २४ तास सुरू ठेवण्यास परवानगी दिली असली तरी मालकांना कामगारांसंबंधी सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा, कामाच्या पाळ्या, साप्ताहिक सुट्टी, अतिरिक्त कामाचा मोबदला आणि सुरक्षेसंबंधी नियम पाळावे लागणार आहेत.

कामगार खात्याने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही व्यापारी आस्थापनेने कायद्यातील तरतुदी किंवा परवानगीच्या अटींचे उल्लंघन केल्यास संबंधित मालकावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

या निर्णयामुळे गोव्यातील दुकाने, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि मॉल्सना रात्री उशिरापर्यंत तसेच संपूर्ण रात्र व्यवसाय करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेषतः पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यापारी क्षेत्राला या निर्णयाचा फायदा होण्याची शक्यता आहे.