Connect with us

गोवा खबर

गोव्यातील पहिल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचा शुभारंभ; नवीन इमारतीसाठी ५३ कोटी रुपये मंजूर

Published

on

Spread the love

पशुवैद्यकीय शिक्षणातून सरकारी नोकरीबरोबरच स्वतःचे रुग्णालय आणि क्लिनिक सुरू करण्याची संधी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोवा खबर : गोव्यातील पहिल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ झाला असून पहिल्या बॅचमध्ये ४० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या महाविद्यालयासाठी नवीन इमारत उभारण्याकरिता सरकारने ५३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. पुढील दोन वर्षांत इमारतीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

नव्याने सुरू झालेल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचच्या स्वागत समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन मंत्री नीळकंठ हळर्णकर, मुख्य सचिव डॉ. कंडावलू, पशुसंवर्धन सचिव मायकल, संचालक डॉ. नितीन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, गोव्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी इतर राज्यांत जावे लागू नये, यासाठी सरकार विविध व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करत आहे. पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे हा त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे. या महाविद्यालयात पहिल्या वर्षासाठी ४० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून आणखी २० ते २५ विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत.

महाविद्यालयाच्या नवीन इमारतीसाठी १६ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच भविष्यातील विस्तारासाठी कोदार येथे आणखी २५ एकर जागा देण्यात आली आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गोव्यात अनेक नागरिक कुत्रे, मांजरी आणि इतर पाळीव प्राण्यांची काळजी घेतात. तसेच पशुपालन करणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. मात्र राज्यात लहान आणि मोठ्या प्राण्यांसाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त मोठी रुग्णालये उपलब्ध नाहीत. त्यामुळे पशुवैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतःचे क्लिनिक आणि रुग्णालय सुरू करण्याची चांगली संधी आहे. अशा उपक्रमांना सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पशुवैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी केवळ सरकारी नोकरीवर अवलंबून राहू नये. त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण कराव्यात. प्राण्यांच्या उपचारांबरोबरच पशुसंवर्धन आणि इतर संबंधित क्षेत्रांतही मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या शैक्षणिक जीवनातील अनुभव सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, १९९१ मध्ये बारावीनंतर गोव्यात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे बीएएमएसचे शिक्षण घेण्यासाठी कोल्हापूरला जावे लागले होते. गोव्यातील विद्यार्थ्यांना अशा अडचणी येऊ नयेत, यासाठी राज्यात नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर दिला जात आहे.

राज्यात कृषी, फॉरेन्सिक सायन्स, नॅशनल वॉटर स्पोर्ट्स, कायदा, मरीन इंजिनिअरिंग आणि मत्स्यव्यवसायाशी संबंधित अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. आता पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी एक महत्त्वाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

पशुवैद्यकीय डॉक्टरांनी केवळ प्राण्यांवर उपचार करण्यापुरते स्वतःला मर्यादित ठेवू नये. त्यांनी गोवा नागरी सेवा आणि भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचेही ध्येय ठेवावे. गोवा हे किनारपट्टीचे राज्य असल्यामुळे मत्स्यव्यवसाय आणि जलचर प्राण्यांच्या आरोग्याशी संबंधित क्षेत्रातही मोठ्या संधी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत २०४७ आणि राज्य सरकारच्या विकसित गोवा २०३७ या संकल्पना पूर्ण करण्यासाठी तरुणांनी योगदान द्यावे. विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण करून आत्मनिर्भर व्हावे आणि स्वयंपूर्ण गोवा अभियानाला बळकटी द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचमधील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.