Connect with us

गोवा खबर

जनगणना २०२७ : उत्तर गोव्यात १६ नोव्हेंबरपासून ऑनलाइन नोंदणी; १ डिसेंबरपासून घरोघरी सर्वेक्षण

Published

on

Spread the love

गोवा खबर: जनगणना २०२७ अंतर्गत उत्तर गोव्यात जनगणनेच्या पुढील टप्प्याची तयारी सुरू झाली आहे. नागरिकांना घरबसल्या आपल्या कुटुंबाची माहिती ऑनलाइन भरता येणार आहे. यासाठी १६ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘सेल्फ-इन्युमरेशन’ सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी तथा मुख्य जनगणना अधिकारी सुरेंद्र नाईक यांनी याबाबत माहिती देत नागरिकांना जनगणनेच्या कामात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

यंदाची जनगणना प्रथमच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबवली जात आहे. नागरिकांना स्वतःची आणि कुटुंबातील सदस्यांची माहिती ऑनलाइन नोंदवण्यासाठी se.census.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. ऑनलाइन माहिती भरल्यानंतर नागरिकांना एक विशिष्ट क्रमांक म्हणजेच ‘SE ID’ मिळणार आहे. हा क्रमांक सुरक्षित ठेवणे आवश्यक असून प्रगणक घरी आल्यावर त्यांना तो दाखवावा लागणार आहे.

उत्तर गोव्यात १ डिसेंबर २०२६ ते ४ जानेवारी २०२७ या कालावधीत प्रगणक घरोघरी भेट देऊन जनगणनेचे काम करणार आहेत. ज्या नागरिकांना ऑनलाइन माहिती भरणे शक्य होणार नाही, त्यांच्या घरी प्रगणक प्रत्यक्ष जाऊन माहिती नोंदवतील. यावेळी नागरिकांना विचारण्यात येणाऱ्या ४० प्रश्नांची अचूक उत्तरे देणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

डिसेंबर महिन्यात सुट्टीसाठी किंवा अन्य कारणांमुळे बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी करून ठेवावी. तसेच प्रगणकांना माहिती मिळावी यासाठी आपला ‘SE ID’ घराच्या दरवाजावर किंवा दर्शनी भागावर लावून ठेवावा, अशी सूचना करण्यात आली आहे.

जनगणनेच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेले प्रगणक आणि पर्यवेक्षक हे शिक्षक तसेच सरकारी कर्मचारी आहेत. ते राष्ट्रीय कर्तव्य बजावत असल्याने नागरिकांनी त्यांच्याशी सन्मानाने वागावे आणि आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जनगणनेदरम्यान नागरिकांकडून गोळा करण्यात येणारी माहिती गोपनीय ठेवली जाणार आहे. या माहितीचा उपयोग केंद्र आणि राज्य सरकारला विविध विकास योजना तयार करण्यासाठी तसेच भविष्यातील धोरणे निश्चित करण्यासाठी होणार आहे.

जनगणना हे राष्ट्र उभारणीच्या दृष्टीने महत्त्वाचे काम असून उत्तर गोव्यातील सर्व नागरिकांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेंद्र नाईक यांनी केले आहे.