Connect with us

गोवा खबर

मराठी राजभाषेच्या जागरासाठी गोव्यात निघणार १५ रथयात्रा; पंढरपूर आणि आळंदीतून घेतले आशीर्वाद

Published

on

Spread the love

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात रथयात्रांचे आयोजन; विठ्ठल-रखुमाईंचे दर्शन आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीस्थळी विशेष प्रार्थना

गोवा खबर: गोव्यात मराठी राजभाषेचा जागर करण्यासाठी मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे नोव्हेंबर २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात राज्यभर १५ रथयात्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. या रथयात्रांच्या तयारीचा भाग म्हणून समितीच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच पंढरपूर आणि आळंदी या तीर्थक्षेत्रांना भेट देऊन विठ्ठल-रखुमाई आणि संत ज्ञानेश्वर माऊलींचे आशीर्वाद घेतले.

मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी याबाबत माहिती दिली. गोव्याच्या कानाकोपऱ्यात मराठी भाषेचा जागर करणे, सांस्कृतिक अस्मिता जपणे आणि संतपरंपरेचा संदेश पोहोचविणे हा या रथयात्रांचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

या उपक्रमाला आध्यात्मिक अधिष्ठान मिळावे आणि रथयात्रांसाठी आवश्यक पूजासाहित्याची व्यवस्था व्हावी, यासाठी संत माऊली वारकरी मंडळाचे अध्वर्यू डॉ. गुरुदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली समितीच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूर आणि आळंदीचा दौरा केला.

या चमूमध्ये डॉ. गुरुदास नाईक, समितीचे राज्य युवाशक्ती प्रभारी नितीन फळदेसाई, संघाचे सहकार्यवाह व रथयात्रा प्रकल्पाचे राज्य संयोजक श्रीगणेश गावडे, राज्य युवाशक्तीप्रमुख विनायक च्यारी आणि अर्चक-कार्यकर्ते यशवंत प्रभुदेसाई यांचा समावेश होता.

कार्यकर्त्यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रखुमाईंचे दर्शन घेतले. त्यानंतर आळंदी येथे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन विशेष प्रार्थना केली. गोव्यातील मराठी राजभाषा आंदोलन यशस्वी व्हावे, यासाठी दोन्ही तीर्थक्षेत्रांत प्रार्थना करण्यात आल्याचे समितीने सांगितले.

या दौऱ्यात पंढरपूर आणि आळंदी येथील संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. गोव्यात होणाऱ्या १५ रथयात्रांसाठी विठ्ठल-रखुमाईंच्या मूर्ती, पवित्र ज्ञानेश्वरी ग्रंथांच्या प्रती, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमा आणि मराठीचे भगवे ध्वज उपलब्ध करून घेण्याची व्यवस्था निश्चित करण्यात आली. या साहित्याचा वापर राज्यातील विविध गावांमध्ये होणाऱ्या सार्वजनिक पूजन कार्यक्रमांसाठी केला जाणार आहे.

आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त योगी निरंजनजी नाथ आणि श्री संत भोजलिंगकाका समाधी मंदिराचे अध्यक्ष प्रदीपजी नानासाहेब गरुड यांनी गोव्यातील कार्यकर्त्यांचे स्वागत करून या उपक्रमासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी आळंदी येथे मराठी राजभाषेसाठी कार्य करणाऱ्या गोव्यातील सर्व कार्यकर्त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज देशमुख (जळगावकर) आणि ह.भ.प. गणेश महाराज कऱ्हाडकर यांची उपस्थिती होती.

दरम्यान, आगामी रथयात्रांच्या माध्यमातून मराठी भाषेचा प्रसार आणि जनजागृती अधिक व्यापक करण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे. मराठी भाषा ही गोव्याच्या सांस्कृतिक परंपरेचा, संतसाहित्याचा आणि अस्मितेचा महत्त्वाचा भाग असल्याचा संदेश या रथयात्रांमधून दिला जाणार आहे.

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील विविध भागांत या १५ रथयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी दिली.