Connect with us

गोवा खबर

गोवा पर्यटनाने टीटीएफ अहमदाबादमध्ये पश्चिम भारताशी पर्यटन सहकार्य अधिक दृढ केले

Published

on

Spread the love

 गुजरातसोबत सांस्कृतिक व आध्यात्मिक पर्यटन सहकार्याचा प्रस्ताव

गोवा खबर: पश्चिम भारतातील पर्यटन भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या आपल्या धोरणाचा भाग म्हणून, गोवा सरकारच्या पर्यटन विभागाने टीटीएफ अहमदाबाद २०२६ मध्ये प्रभावी उपस्थिती नोंदवली. गोवा पॅव्हेलियनचे उद्घाटन गुजरातचे माननीय मुख्यमंत्री श्री भूपेंद्र पटेल यांच्या हस्ते, गोव्याचे पर्यटन मंत्री श्री रोहन ए. खंवटे, गुजरातचे उपमुख्यमंत्री श्री हर्ष संघवी, उत्तराखंडचे पर्यटन मंत्री श्री सतपाल महाराज, वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या उद्घाटन सोहळ्याने देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यांमधील वाढत्या सहकार्याचे दर्शन घडवले. यावेळी गोवा आणि गुजरात या दोन्ही राज्यांनी सांस्कृतिक व आध्यात्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्याच्या शक्यतेवर चर्चा केली. या उपक्रमाद्वारे दोन्ही राज्यांतील पर्यटन संबंध अधिक दृढ करणे आणि पर्यटकांची देवाणघेवाण वाढवणे हे उद्दिष्ट आहे.

गोव्याचे पर्यटन मंत्री श्री रोहन ए. खंवटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात पर्यटन विभाग, गोवा पर्यटन विकास महामंडळ (GTDC), आघाडीची हॉटेल्स व रिसॉर्ट्स, डेस्टिनेशन मॅनेजमेंट कंपन्या, ट्रॅव्हल एजन्सी आणि आदरातिथ्य क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. या माध्यमातून गोव्याच्या विकसित होत असलेल्या पर्यटन परिसंस्थेचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले आणि देशभरातील पर्यटन व्यावसायिकांशी संवाद साधण्यात आला.

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी गोवा पॅव्हेलियन हे प्रमुख आकर्षण ठरले. टूर ऑपरेटर्स, ट्रॅव्हल कंपन्या, डेस्टिनेशन वेडिंग नियोजक, MICE आयोजक, आदरातिथ्य क्षेत्रातील प्रतिनिधी आणि पर्यटकांनी मोठ्या उत्साहाने पॅव्हेलियनला भेट दिली. येथे डेस्टिनेशन वेडिंग, MICE, आध्यात्मिक पर्यटन, वेलनेस, खाद्यसंस्कृती, साहसी पर्यटन, अंतर्गत (हिंटरलँड) पर्यटन सर्किट्स आणि पुनरुत्पादक (Regenerative) पर्यटन अशा विविध पर्यटन संकल्पनांचे सादरीकरण करण्यात आले. यामुळे गोव्याची वर्षभर पर्यटनासाठी उपयुक्त असलेल्या बहुआयामी पर्यटनस्थळाची प्रतिमा अधिक बळकट झाली.

यावेळी बोलताना गोव्याचे पर्यटन मंत्री श्री रोहन ए. खंवटे म्हणाले, गोव्याला पसंतीचे पर्यटनस्थळ म्हणून सातत्याने प्रेम आणि विश्वास दाखविल्याबद्दल आम्ही गुजरातमधील नागरिकांचे आभारी आहोत. गुजरात हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पर्यटन बाजारपेठ आहे. टीटीएफ अहमदाबाद हे पर्यटन व्यवसायाशी भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी आणि सांस्कृतिक व आध्यात्मिक पर्यटनासारख्या नव्या सहकार्याच्या संधी शोधण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. जगप्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांबरोबरच आज गोवा जागतिक दर्जाचे डेस्टिनेशन वेडिंग, ‘एकादश तीर्थ यात्रासारखे आध्यात्मिक पर्यटन मार्गसमृद्ध ग्रामीण पर्यटन अनुभव आणि स्थानिक समुदायाच्या सहभागातून विकसित होणारे पर्यटन असे अनेक पर्याय पर्यटकांसाठी उपलब्ध करून देत आहे. गुजरात आणि गोवा यांच्यातील वाढती हवाई संपर्क व्यवस्था भविष्यात पर्यटनाला अधिक चालना देईल आणि दोन्ही राज्यांच्या आर्थिक विकासाला हातभार लावेल.”

यंदाच्या प्रदर्शनात गोव्याने डेस्टिनेशन वेडिंग आणि MICE पर्यटनावर विशेष भर दिला. आधुनिक अधिवेशन केंद्रे, आलिशान रिसॉर्ट्स, वारसास्थळे, उत्कृष्ट आदरातिथ्य सुविधा आणि मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळाद्वारे उपलब्ध सुलभ हवाई संपर्क यामुळे गोवा या क्षेत्रासाठी आदर्श ठरत असल्याचे अधोरेखित करण्यात आले. याशिवाय नुकतीच सुरू करण्यात आलेली ‘एकादश तीर्थ यात्रा’, जी गोव्यातील अकरा प्राचीन मंदिरांना जोडणारी आध्यात्मिक पर्यटन सर्किट आहे, त्यासोबतच वेलनेस, खाद्यसंस्कृती आणि साहसी पर्यटनाच्या विविध संधींचेही सादरीकरण करण्यात आले.

संपूर्ण प्रदर्शनादरम्यान गोवा पर्यटन विभाग आणि उद्योग क्षेत्रातील भागीदारांनी विविध व्यावसायिक बैठक, खरेदीदार-विक्रेता संवाद आणि नेटवर्किंग सत्रांमध्ये सहभाग घेतला. यामध्ये व्यापार भागीदारी मजबूत करणे, नवीन बाजारपेठांपर्यंत पोहोच वाढवणे आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी गोव्याच्या वैविध्यपूर्ण पर्यटन अनुभवांचे प्रभावी प्रमोशन करणे यावर भर देण्यात आला.

टीटीएफ अहमदाबादमधील गोवा पर्यटन विभागाचा सहभाग हा पर्यटनाचे विविधीकरण, पर्यटकांच्या मुक्कामाचा कालावधी वाढवणे, राज्यांमधील सहकार्य मजबूत करणे तसेच स्थानिक समुदाय आणि पर्यटन क्षेत्राला दीर्घकालीन लाभ मिळवून देणाऱ्या शाश्वत व पुनरुत्पादक पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या दीर्घकालीन धोरणाचा महत्त्वाचा भाग असल्याचे विभागाने स्पष्ट केले.