गोवा खबर: जवळपास दोन महिन्यांच्या जनजागृती मोहिमा आणि वारंवार मुदतवाढीनंतर गोव्यात आजपासून (१ ऑगस्ट) AI-आधारित वाहतूक चलन (AI-enabled Traffic Challan) प्रणाली पूर्णपणे लागू करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात राज्यातील २६ प्रमुख चौकांमध्ये बसविण्यात आलेल्या स्मार्ट कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर स्वयंचलित ई-चलन जारी केले जाणार आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅमेरे काही काळ निरीक्षण (Monitoring Mode) पद्धतीने कार्यरत होते. या कालावधीत वाहनचालकांना नव्या प्रणालीची माहिती मिळावी आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याची संधी देण्यात आली.
सुरुवातीला ही प्रणाली जून महिन्यात लागू करण्याचे नियोजन होते. मात्र, त्या वेळी नियमभंगाच्या घटनांचे प्रमाण जास्त असल्याने अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली होती. आता वाहनचालकांना पुरेसा वेळ दिल्यानंतर १ ऑगस्टपासून प्रत्यक्ष चलन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
वाहतूक विभागाने वाहनचालकांना सर्व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे, अन्यथा AI कॅमेऱ्यांद्वारे नियमभंगाची नोंद होऊन संबंधित वाहनधारकाला स्वयंचलित चलन पाठविले जाईल.