Connect with us

गोवा खबर

बिल्वदल परिवारातर्फे ८ ऑगस्ट रोजी पारंपरिक वैद्यांचा होणार गौरव

Published

on

Spread the love

– डॉ. प्रेमानंद रामाणी यांना बिल्वदल गोवा भूषण‘ पुरस्कार,  वनौषधी वैद्यांची गौरविकाही होणार प्रकाशीत


गोवा खबर:गोव्यातील पारंपरिक वनौषधी उपचारपद्धतीचा वारसा जपणाऱ्या गावठी वैद्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी बिल्वदल परिवारातर्फे गोवा माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या सहकार्याने यंदाच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे. शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वा. पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या मुख्य सभागृहात हा भव्य कार्यक्रम होणार असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक वैद्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

गोव्याच्या लोकजीवनात शतकानुशतके रूजलेल्या वनौषधी उपचार परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात राज्यातील विविध भागांत कार्यरत असलेल्या गावठी वैद्यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे. आधुनिक वैद्यक शास्त्राबरोबरच पारंपरिक ज्ञानाच्या आधारे अनेक रुग्णांना उपचार देणाऱ्या या वैद्यांचे कार्य समाजासमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे.

या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गोव्यातील वनौषधींच्या साहाय्याने विविध आजारांवर उपचार करणाऱ्या पारंपरिक वैद्यांचा परिचय करून देणाऱ्या विशेष ‘गौरविका’ स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार असून त्यामध्ये राज्यभरातील वनौषधी उपचार पद्धती जपणाऱ्या वैद्यांची माहिती, त्यांचे अनुभव, कार्य आणि पारंपरिक ज्ञानाचा वारसा यांचा समावेश करण्यात आला आहे. ही गौरविका गोव्याच्या लोकवैद्यक परंपरेचे दस्तऐवजीकरण करणारा महत्त्वपूर्ण ठेवा ठरणार असल्याचे मानले जात आहे. गोव्याच्या पारंपरिक वनौषधी ज्ञानाचा सन्मान करण्याबरोबरच ते पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश देणारा हा सोहळा राज्याच्या सांस्कृतिक आणि आरोग्य परंपरेचा गौरव करणारा ठरणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, पारंपरिक वैद्य तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गोविंद भगत आणि सिद्धी उपाध्ये करणार असून बिल्वदल परिवाराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकपरंपरा जपण्याच्या कार्याला या सोहळ्याच्या माध्यमातून नवे अधिष्ठान लाभणार आहे.

यावेळी बिल्वदल परिवाराचा प्रतिष्ठेचा ‘बिल्वदल गोवा भूषण’ पुरस्कार प्रख्यात गोमंतकीय न्यूरॉस्पाइनल शल्यविशारद डॉ. प्रेमानंद रामाणी यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे दीर्घकालीन योगदान, संशोधन आणि रुग्णसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

वैद्यकीय क्षेत्रात आपल्या संशोधन, नावीन्यपूर्ण शस्त्रक्रिया तंत्र आणि रुग्णसेवेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या गोमंतकीय व्यक्तिमत्त्वांमध्ये डॉ. प्रेमानंद शांताराम रामाणी (पी. एस. रामाणी) यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. न्यूरोस्पाइनल शस्त्रक्रिया क्षेत्रातील त्यांचे योगदान केवळ भारतापुरते मर्यादित नसून जगभरातील तज्ज्ञांकडून त्याची दखल घेतली गेली आहे. डॉ. रामाणी यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे पाठीच्या कण्यावरील शस्त्रक्रियेसाठी विकसित केलेले ‘पीएलआयएफ रमाणी तंत्र’ होय. डॉ. रामाणी यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी अनेक महत्त्वाची संदर्भ पुस्तके संपादित व प्रकाशित केली आहेत. पाठीच्या कण्यावरील शस्त्रक्रिया, मणक्यांचे विकार, शस्त्रक्रियेतील आधुनिक तंत्रज्ञान यांसारख्या विषयांवरील त्यांच्या पुस्तकांचा वापर अनेक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केला जातो. त्यांच्या संशोधन लेखांना आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकांमध्येही मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे तें जगभरातील स्पाइन सर्जनसाठी मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. गोव्यात दरवर्षी आयोजित होणारी ‘डॉ. पी. एस. रामाणी गोवा मॅरेथॉन’ ही राज्यातील प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धापैकी एक मानली जाते. देश-विदेशातील धावपटू या स्पर्धेत सहभागी होतात. याशिवाय त्यांनी गोव्यात स्वतःच्या संशोधन कार्याचा, सामाजिक उपक्रमांचा आणि प्रकाशित पुस्तकांचा वारसा जतन करणारे संग्रहालयही उभारले आहे.