गोवा खबर: गोवा गृहनिर्माण मंडळाच्या माध्यमातून न्यू वाडे,दाबोळी येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते 120 पात्र लाभार्थ्यांना गृहनिर्माण मंडळाच्या घरांचे वाटपपत्र प्रदान करण्यात आले.
या उपक्रमामुळे अनेक वर्षांपासून घराच्या नियमित मालकी हक्काची प्रतीक्षा करणाऱ्या कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. विशेषतः वास्को परिसरातील नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना या योजनेचा मोठा लाभ झाला असून, दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला त्यांचा घरांचा प्रश्न मार्गी लागला आहे.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, प्रत्येक पात्र नागरिकाला सुरक्षित आणि कायमस्वरूपी निवारा उपलब्ध करून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. नियमित घराचा हक्क हा केवळ निवारा देण्यापुरता मर्यादित नसून तो नागरिकांचा स्वाभिमान, सुरक्षितता आणि त्यांच्या कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचा आहे, असे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना कायमस्वरूपी निवासाची हमी मिळाल्याने त्यांच्या जीवनात स्थैर्य आणि सुरक्षिततेची नवी आशा निर्माण झाली आहे. सरकारच्या सामाजिक कल्याण आणि सर्वसमावेशक विकासाच्या धोरणाचा हा महत्त्वाचा टप्पा असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.