गोवा खबर : मुसळधार पाऊस आणि वाढलेल्या जलपातळीच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारच्या महसूल विभागाने बुडण्याच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांना सार्वजनिक सुरक्षा सल्ला जारी केला आहे.
या सल्ल्यानुसार, नागरिकांनी नद्या, तलाव, धरणे, कालवे, धबधबे, समुद्रकिनारे आणि इतर जलाशयांमध्ये जाणे, पोहणे किंवा आंघोळ करणे टाळावे. पाण्याखाली गेलेले रस्ते, पूल आणि कॉजवे ओलांडू नयेत, कारण वाहते पाणी धोकादायक ठरू शकते.
सरकारने प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पालकांनी लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे, तर पर्यटकांनी केवळ अधिकृत समुद्रकिनारे आणि जलक्रीडा केंद्रांनाच भेट द्यावी. बोटीतून प्रवास करताना किंवा जलक्रीडा करताना लाइफ जॅकेटचा वापर करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
तसेच, मुसळधार पावसाच्या काळात नदीकाठ, धरणे, धबधबे आणि किनारी भागात जाणे टाळावे. नागरिकांनी हवामान खात्याच्या अधिकृत सूचना आणि इशाऱ्यांचे पालन करावे तसेच आपत्कालीन परिस्थितीत 112 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सरकारने केले आहे.
गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (GSDMA) जारी केलेला हा सुरक्षा सल्ला तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे.