गोवा खबर:मराठी राजभाषेसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अधिक व्यापक आणि गुणात्मक बनवण्यासाठी मराठी राजभाषा निर्धार समितीने ‘मराठी सद्भावना मिलन’ हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ काल वास्को (मुरगाव) येथील एच.क्यू. हॉटेलच्या सभागृहात मान्यवरांच्या चहापान व चर्चेने झाला.
या कार्यक्रमाच्या निमंत्रक, लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या प्रा. ललिता परेश जोशी यांनी, मराठीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने या आंदोलनात आपल्या क्षमतेनुसार सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला साहित्यिक व समीक्षक प्रा. नारायण महाले यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले.
व्यासपीठावर समितीचे राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर, ललिता जोशी, प्रा. नारायण महाले आणि केंद्रीय युवाशक्ती प्रभारी नितीन फळदेसाई उपस्थित होते. नितीन फळदेसाई यांनी आपल्या प्रास्ताविकात, गोव्यात १९८७ च्या राजभाषा कायद्यापूर्वीपासून सुरू असलेल्या मराठी आंदोलनाचा आणि मार्च २०२५ पासून समितीच्या बॅनरखाली सुरू झालेल्या चळवळीचा आढावा घेतला.
प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी सरकारी धोरणांवर टीका करताना सांगितले की, मराठीला मिळालेला ‘सहभाषा’ दर्जा पूर्णपणे अर्थहीन आहे. शासकीय अनास्थेमुळे राज्यातील ५०% मराठी शाळा बंद पडल्या आहेत, नवीन मराठी शाळांवर बंदी असून इंग्रजी शाळांना मात्र मुक्त परवाने दिले जात आहेत. तसेच मराठी शाळांची अनुदान योजना बंद करण्यात आली असून, सरकारी नोकऱ्यांच्या प्रश्नपत्रिकेतूनही मराठीला हद्दपार करण्यात आले आहे. त्यामुळे मराठीला अधिकृत राजभाषा दर्जा मिळवून दिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे ते म्हणाले.
या महत्त्वपूर्ण चर्चेत प्राचार्य नरहरी जंबगी, अलका दामले, प्रा. उल्हास जोशी, वर्षा देशपांडे, मीना समुद्र आणि मोहन मोघे या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला.
चर्चेनंतर सर्व उपस्थितांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या. सामूहिक पसायदानाने या कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली. ग्रामीण व शहरी भागात स्वाक्षरी मोहीम वेगाने सुरू असतानाच आता प्रत्येक प्रखंडात अशा बैठका घेतल्या जाणार आहेत.