‘मराठीप्रेमी कोकणीमाणूस’ नावाने सोशल मीडियावर एंट्री; जनजागृतीसाठी ऑनलाईन माध्यमांचा प्रभावी वापर
गोवा खबर : मराठी राजभाषा निर्धार समितीच्या मराठी राजभाषा चळवळीला आता आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. गोव्यामध्ये मराठी भाषेविषयी जनजागृती करण्यासाठी विविध ऑनलाईन माध्यमांचा वापर अधिकृतपणे सुरू करण्यात आला आहे. समितीच्या विशेष आयटी पथकाच्या मार्गदर्शनाखाली ‘मराठीप्रेमी कोंकणीमाणूस’ या नावाने स्वतंत्र व्हॉट्सॲप चॅनेल आणि इंस्टाग्राम खाते सुरू करण्यात आले आहे. यासोबतच, देशाच्या राष्ट्रपतींना उद्देशून ‘कोकणी श्वास : मराठी ध्यास’ या शीर्षकाची एक विशेष ऑनलाईन याचिकाही (पिटिशन) प्रसारित करण्यात आली आहे, ज्या माध्यमातून मराठी भाषेच्या हक्कासाठी पाठिंबा गोळा केला जात आहे.
समितीने या डिजिटल उपक्रमांसाठी दोन स्वतंत्र आणि आकर्षक बोधचिन्हांची (लोगो) निर्मिती केली आहे. ‘मराठीप्रेमी कोंकणीमाणूस’ या सोशल मीडिया खात्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप व तलवारमंडित ‘म’ हे मंडळाकार बोधचिन्ह स्वीकारण्यात आले आहे. तर दुसरीकडे, ‘कोकणी श्वास : मराठी ध्यास’ या ऑनलाईन याचिकेसाठी गोव्याच्या नकाशाच्या पार्श्वभूमीवर शिवरायांची भव्य प्रतिमा असलेले बोधचिन्ह वापरण्यात आले आहे. मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर आणि प्रमुख मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर यांनी गोव्यातील सर्व मराठीप्रेमी जनतेला या ऑनलाईन याचिकेला जास्तीत जास्त संख्येने पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. तसेच सर्वांनी व्हॉट्सॲप चॅनेल आणि इंस्टाग्राम खात्याशी जोडून घेऊन ही मराठी राजभाषा चळवळ अधिक व्यापक आणि प्रभावी करण्यासाठी सक्रिय सहकार्य करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.