Connect with us

गोवा खबर

गोव्यातील सर्व ३० जागांवर शिवसेना लढणार; भाजपसोबत युतीला स्पष्ट नकार

Published

on

Spread the love

गोवा खबर : आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना राज्यातील सर्व ३० मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तीकर यांनी केली. पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका स्पष्ट करत भाजपसोबत कोणतीही युती होणार नसल्याचे ठामपणे सांगितले.

कीर्तीकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रात जरी शिवसेना आणि भाजप युतीत असले तरी गोव्यातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे गोव्यात शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. गेल्या काही वर्षांत केलेल्या सर्वेक्षणातून राज्यातील जनतेमध्ये विद्यमान सरकारविरोधात नाराजी असल्याचे दिसून आले असल्याचा दावा त्यांनी केला.

राज्यात शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि मूलभूत सुविधांबाबत अनेक प्रश्न प्रलंबित असून बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी वाढल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारच्या धोरणांमुळे सामान्य नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

रोजगाराच्या मुद्द्यावर बोलताना कीर्तीकर यांनी स्थानिक युवकांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला. अनेक सरकारी आणि खासगी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना डावलले जात असल्याने युवकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. रोजगार, भूमिपुत्रांचे हक्क आणि विकासाशी संबंधित प्रश्न हे शिवसेनेच्या निवडणूक प्रचारातील प्रमुख मुद्दे असतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेला उपेंद्र गावकर, सुनील सांतीनोजकर तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना राज्यातील जनतेसमोर पर्याय म्हणून उभी राहणार असून आगामी निवडणुकीत स्वतंत्र ताकदीने मैदानात उतरणार असल्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला.