गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक सेवेला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘सर्वांसाठी आरोग्यसेवा’ हा संकल्प अधिक व्यापक करण्याचा निर्धार राज्य सरकारने केला असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.
राणे म्हणाले की, गोवा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील (GMCH) डे केअर सुविधांचा दरमहा सुमारे १,००० रुग्ण लाभ घेत आहेत. ही यशस्वी सुविधा आता संपूर्ण गोवा राज्यात टप्प्याटप्प्याने विस्तारण्यात येणार आहे.
ते म्हणाले की, दर्जेदार आरोग्यसेवा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे ही सरकारची बांधिलकी असून पंतप्रधान मोदी यांच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाच्या निमित्ताने हा संकल्प अधिक दृढ करण्यात आला आहे.
दरम्यान, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील कॅथलॅब (Cathlab) सुविधा पुढील सहा महिन्यांत कार्यान्वित होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. याशिवाय रुग्णालयात इतर सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सुविधा देखील निश्चित कालमर्यादेत सुरू करण्यात येणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
यामुळे दक्षिण गोव्यातील रुग्णांना हृदयरोगासह विविध गंभीर आजारांवरील अत्याधुनिक उपचार स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार असून आरोग्य सेवेला नवे बळ मिळणार आहे.