Connect with us

गोवा खबर

हणजूण-शिवोलीत खंडित विजेचा ‘भडका’

Published

on

Spread the love

संतप्त ग्रामस्थांची पणजीत वीज खात्याच्या मुख्यालयात धाव; अधिकाऱ्यांना विचारला जाब; नावेलीतही उद्रेक

गोवा खबर : बार्देश तालुक्यातील हणजूण आणि शिवोली परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार उद्भवणाऱ्या खंडित वीजपुरवठ्याच्या समस्येविरोधात स्थानिक नागरिकांसह युवकांनी मंगळवारी तीव्र संताप व्यक्त केला. स्थानिक युवा नेते गजानन तिळवे, योगेश गोवेकर आणि अन्य स्थानिक रहिवाशांनी सुरुवातीला म्हापसा येथील वीज विभागाच्या कार्यालयाला भेट देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र तिथे समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने या शिष्टमंडळाने थेट पणजी येथील वीज खात्याचे मुख्य कार्यालय गाठले.

गजानन तिळवे यांनी सांगितले की, हणजूण आणि शिवोली भागात वारंवार वीज खंडित होणे, अचानक शटडाऊन लागू होणे आणि अनियमित पुरवठा यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. अनेक वेळा कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा बंद होत असल्याने दैनंदिन व्यावसायिक कामकाजावर आणि जनजीवनावर याचा अतिशय वाईट परिणाम होत आहे.

पणजीतील वीज खात्याच्या मुख्य कार्यालयात पोहोचल्यानंतर आंदोलकांनी सहाय्यक अभियंता (एई) काशिनाथ शेट्ये यांची भेट घेतली. यावेळी शेट्ये यांनी तात्काळ बार्देश परिसरातील सर्व कनिष्ठ अभियंत्यांशी (जेई) संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली आणि नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे कडक निर्देश दिले. या हस्तक्षेपामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी भविष्यातही अशीच परिस्थिती कायम राहिल्यास ती सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा तिळवे यांनी दिला. या संपूर्ण प्रकरणाच्या चर्चेदरम्यान वीज विभागात कनिष्ठ अभियंत्यांची मोठी कमतरता असल्याचे समोर आले असून, एकाच अधिकाऱ्याकडे अनेक भागांची जबाबदारी असल्याने कामकाजावर प्रचंड ताण येत आहे. तसेच परिसरात नवीन मोठे प्रकल्प उभारले जात असल्याने भविष्यात विजेची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे वीज पुरती गायब होण्याची भीती व्यक्त होत आहे. खंडित होणाऱ्या विजेची समस्या पूर्णपणे सोडविल्याशिवाय नव्या मोठ्या प्रकल्पांना परवानगी देऊ नये, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

दुसरीकडे नावेली मतदारसंघातही वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांच्या समस्यांची दखल घेत, सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश भगत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी जिल्हा पंचायत सदस्य डॅनी फर्नांडिस, कनिष्ठ अभियंता आणि लाईनमन निरीक्षकांसह मंगळवारी विविध ट्रान्सफॉर्मर्स आणि वीज पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. नावेलीत सध्या व्होल्टेजमधील चढ-उतार आणि ट्रान्सफॉर्मर निकामी होण्याचे सत्र सुरू असून, यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. पाहणीदरम्यान नावेलीतील जनता गेली अनेक वर्षे हा त्रास सहन करत आहे, पण आता लोकांची सहनशीलता संपली आहे, असे भगत यांनी प्रशासनाला ठणकावून सुनावले.