Connect with us

गोवा खबर

मंजूर २५० कोटींचा निधी देण्याची केंद्राकडे मागणी

Published

on

Spread the love

मुख्यमंत्री : सांतइनेज खाडी, साळ नदी साफ करणार

गोवा खबर : अंजुणे धरणाचे नूतनीकरण व इतर विविध विकासकामांसाठी २५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत, परंतु हा निधी प्रत्यक्ष मिळणे अजून बाकी आहे. सध्या या निधीला केवळ हंगामाी मंजुरी मिळालेली असल्याने, त्याबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी दिल्लीहून परतल्यानंतर सांगितले. याशिवाय नदी शुद्धीकरण प्रकल्पांतर्गत साळ नदीचे संपूर्ण शुद्धीकरण केले जाणार असून, त्याचा रीतसर प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला जाईल अशी माहितीही त्यांनी दिली. सांतइनेज खाडीबाबतही सरकारने असाच महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्याचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे.

याबाबत मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले की, नवी दिल्लीतील दौऱ्यादरम्यान केंद्रीय पर्यावरण तथा वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन गोव्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. त्यांनी हे सर्व संबंधित प्रश्न सकारात्मकतेने सोडवण्याचे आश्वासन दिले असून राज्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. दरम्यान, एसटी आरक्षणाबद्दल पत्रकारांनी विचारणा केली असता, त्याविषयी सध्या वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे एवढेच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच राज्य मंत्रिमंडळात नवीन मंत्र्यांचा समावेश केला जाणार आहे का आणि तीन नवे मंत्री घेतले जाण्याची जी चर्चा सुरू आहे, त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन बाळगणे पसंत केले.